अंकुशराव लांडगे नाट्यगृहाची कोटीची उड्डाणे  
दरवर्षी उत्पन्नाचा चढता आलेख ः स्नेहसंमेलन, कंपन्या व राजकीय कार्यक्रमांची रेलचेल

अंकुशराव लांडगे नाट्यगृहाची कोटीची उड्डाणे दरवर्षी उत्पन्नाचा चढता आलेख ः स्नेहसंमेलन, कंपन्या व राजकीय कार्यक्रमांची रेलचेल

भोसरी, ता. ३ ः कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाचा दरवर्षी उत्पन्नाचा चढता आलेख आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात नाट्यगृहाने एक कोटी बारा लाख ६८ हजारांचे उत्पन्न मिळवत स्वतःच्याच वार्षिक उत्पन्नाचा विक्रम मोडला आहे.
या नाट्यगृहाची साडेनऊशे आसन क्षमता असून, पिंपरी चिंचवड शहरातील क्रमांक दोनचे मोठे नाट्यगृह अशी त्याची ओळख आहे. मात्र, या नाट्यगृहात काही संस्थांनी आयोजित केलेल्या नाटकांचा अपवाद सोडता नाटकाचे प्रयोग होत नाहीत. २०२० पासून आतापर्यंत या नाट्यगृहात एकही प्रायोगिक अथवा व्यावसायिक नाटकाचे प्रयोग झालेले नाहीत. मात्र, तरीही या नाट्यगृहाच्या उत्पन्नाचा आलेख दरवर्षी चढता राहिला आहे. विशेष म्हणजे या नाट्यगृहात
शाळांची स्नेहसंमेलने, कंपन्यांचे कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, सामाजिक संस्थांचे कार्यक्रम आदींची वर्षभर रेलचेल असते. डिसेंबर ते एप्रिलमध्ये शाळांच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमांनी नाट्यगृह दिवसभर ‘बुक’ असते. या काळात स्नेहसंमेलनासाठी तारीख मिळविण्यासाठी शाळांमध्ये चढाओढ सुरू असते. या कार्यक्रमांमुळेच नाट्यगृहांच्या उत्पन्नातही भरघोस वाढ झालेली दरवर्षी पहायला मिळत आहे.
गेल्या वर्षी एप्रिलपासून बंद असलेली नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा या वर्षी मे महिन्यांतही सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे काही संस्थांनी नाट्यगृहातील नियोजित कार्यक्रमही रद्द केले. मात्र, वातानुकूलित यंत्रणा बंद असतानाही नाट्यगृहाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांत एक कोटी बारा लाख ६८ हजारांचे उत्पन्न मिळवले. नाट्यगृहाला आॅक्टोबर ते फेब्रुवारीत दहा लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. यात डिसेंबरमध्ये २४ लाख ५५ हजाराचे उत्पन्न सर्वाधिक आहे.

‘‘भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पूर्वी नाट्यगृहात शंभर टीआरचे दोन प्लांट होते. आता साठ टीआरचे चार प्लांट बसविण्यात येत आहेत. यातील तीन प्लांट कार्यक्रमादरम्यान सुरू राहतील तर एक प्लांट स्टॅंटबाय राहील.
-महेश कावळे, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, इ क्षेत्रीय कार्यालय, भोसरी.

नाट्यगृहात उपहारगृहाचा अभाव
नाट्यगृहात शाळांची स्नेहसंमेलने होत असतानाही येथे उपहारगृहाचा अभाव आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची निराशा होत आहे. नाट्यगृहामध्ये उपाहारगृह सुरू केल्यावर नाट्यगृहाच्या उत्पन्नातही अधिक भर पडणार आहे. त्यामुळे येथे उपाहारगृह सुरू करण्याची मागणी श्रोत्यांमधून होत आहे.

असे वाढले उत्पन्न
वर्ष कार्यक्रमांची संख्या उत्पन्न (रुपये)
२०१९-२० ५७६ ६४,८५,६९२
२०२०-२१ (कोरोना काळ) २५ ७,७०,७१४
२०२१-२२ (कोरोना काळ) ७२ १०,१८,६७६
२०२२-२३ ४८३ ७६,८४,५९४
२०२३-२४ २९० १,१२,६८,२९६


फोटोः 02000

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com