भाजी मंडई की डोक्याची ‘मंडई’

भाजी मंडई की डोक्याची ‘मंडई’

Published on

संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. १३ ः भोसरी आणि दिघीतील काही रस्त्यावर फळे-भाजी विक्रेते बसत असून, या रस्त्यांची भाजी मंडई होत आहे. रस्त्यावरील अनधिकृत विक्रेत्यांमुळे रस्त्यांची रुंदी कमी होत आहे. त्याचप्रमाणे ग्राहक रस्त्यावरच वाहने लावत असल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी वाहन चालक आणि नागरिकांमधून होत आहे.
भोसरी आणि दिघीची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात भाजी मंडई कमी पडत आहे. भोसरीतील दिघी रस्ता, आळंदी रस्त्यावरील बनाचा ओढा ते मॅगझीन चौक, पुणे-नाशिक महामार्गाच्या धावडेवस्तीजवळील सेवा रस्ता, सेवा रस्त्यावरील पीएमटी चौक ते चांदणी चौक त्याचप्रमाणे दिघीतील छत्रपती संभाजी महाराज चौक ते भारतमातानगर, दिघीतील आळंदी-पुणे पालखी मार्गाचा पदपथ आदी रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते अनधिकृतपणे बसत आहेत. भाजी-फळे खरेदी करण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस ग्राहक मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दिघीला भाजी मंडईच नाही
दिघी हे झपाट्याने विकसित होणारे उपनगर असून, दिघी परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. दिघीची लोकसंख्या वाढत असतानाही दिघीमध्ये एकही भाजी मंडई नाही. त्याचप्रमाणे महापालिकेकडे भाजी मंडईसाठी जागाही आरक्षित नाही. त्यामुळे दिघीकरांना रस्त्यावरील भाजीमंडई विक्रेत्यांवरच अवलंबून राहावे लागत आहे.

पार्किंगच्या जागी फळे भाजीची दुकाने
भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये भाजी मंडईच्या गाळ्यातील ताबा भाजी विक्रेत्यांना दिला आहे. मात्र, भाजी विक्रेते गाळ्यांमध्ये भाजी विक्रीसाठी न बसता विक्रेत्यांनी मंडईतील वाहनांच्या पार्किंगच्या जागेत दुकाने थाटली आहेत. त्यामुळे भाजी मंडईतील गाळे रिकामेच आहेत. याकडेही महापालिका दुर्लक्ष करत आहे.


रस्त्यावरील भाजी मंडईमुळे समस्या
- विक्रेत्यांद्वारे अनधिकृतपणे रस्त्याचा ताबा
- पदपथ आणि रस्त्यावरील अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याने जावे लागते, अपघाताचा धोका
- रस्त्याची रुंदी कमी झाल्याने वाहतूक कोंडी
- रस्त्याचे विद्रुपीकरण आणि बकालावस्था

काय करायला हवे
- वर्दळीच्या रस्त्यावर बसणाऱ्या भाजी-फळे विक्रेत्यांवर कारवाई गरजेची
- विविध विक्रेत्यांचे पुनर्वसन करणे
- हॉकर्स झोन तयार करणे आवश्यक
- रस्ते अतिक्रमणमुक्त करणे


पुनर्वसन महापालिकेसाठी डोकेदुखी!
पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील विविध विक्रेत्यांचे पुनर्वसन केले आहे. मात्र, राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील दुकानात ग्राहक येत नसल्याने फळे विक्रेते पुन्हा सेवा रस्त्यावर हातगाड्या लावत आहेत. त्यामुळे येथील पुनर्वसन महापालिकेसाठी डोकेदुखी ठरली आहे.


‘‘भोसरीतील दिघी रस्त्यावरील विविध विक्रेत्यांच्या पुनर्वसनासाठी महापालिका जागेचा शोध घेत आहे. दिघीमध्ये भाजी मंडईसाठी जागाच आरक्षित नसल्याने तेथे अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्यातरी दिघीतील पालखी मार्गावर भाजी विक्रेते बसत

आहेत. दिघीमध्ये भाजीमंडईसाठी जागा मिळाल्यावर तेथे भाजी मंडई उभारण्यात येईल.
- राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी, ई प्रभाग

‘‘रस्त्यांवर विक्रेत्यांकडून भाजी व फळे मंडईच्या तुलनेत काहीसे स्वस्त मिळतात. रस्त्याने जाता-जाता भाजी मिळत असल्याने वेळ वाचतो.’’
- सुलभा शिंदे, ग्राहक

रस्त्यावरील फळे-भाजी विक्रेत्यांमुळे रस्त्यावर वाहनांची कोंडी होते. दिघी रस्त्यावर दररोज संध्याकाळी वाहनांच्या कोंडीचा सामना करावा लागतो. अर्धा किलोमीटरच्या रस्त्याचे अंतर पार करण्यासाठी सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे लागतात. वाहने सुरूच राहत असल्याने इंधन अधिक लागते. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे.
- बाळासाहेब गायकवाड, वाहन चालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com