भोसरी हद्दीत नाशिक महामार्ग धोक्याचा
भोसरी, ता. ४ - पिंपरी चिंचवड हद्दीतून जाणारा पुणे-नाशिक महामार्ग नागरिकांसाठी धोक्याचा झाला आहे. येथे अतिक्रमणे वाढली असून, साइडपट्ट्या भरलेल्या नाहीत. काही ठिकाणी कडेलाच मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे पादचारी, वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
याच परिसरात मे २०२२ मध्ये महापालिकेने अतिक्रमणे काढली होती. मात्र, दुर्लक्षामुळे ती पुन्हा वाढली. आता रस्ता मोकळा करण्यासाठी पुन्हा मोहीम राबविण्याची वेळ आली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर सदैव वर्दळ असते. लगतच भोसरी, धावडेवस्ती, लांडगेनगर, सद्गुरूनगर आहे. महामार्गावरून या परिसरांत ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना या गैरसोयीचा त्रास होत आहे. कासारवाडी-नाशिकफाटा ते स्पाइन रस्त्यावरील राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या सुमारे चार किलोमीटर रस्त्याच्या साइडपट्ट्या भरलेल्या नाहीत. काही ठिकाणी साइडपट्ट्यापासून रस्ता एक ते दीड फूट उंचीवर आहे.
या परिसरात अपघाताचा धोका
भोसरीतील गुडविल चौक (एमआयडीसी चौक), लांडेवाडीतील प्रवेशद्वार चौक, पीएमपीएमएलचा सद्गुरू आगार चौक, स्पाइन रस्त्यावरील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काही वाहनचालक रस्त्याखाली उतरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सिग्नल सुटल्यावर पुन्हा मुख्य रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करतात. तेथे साइडपट्टी भरलेली नाही. लांडगेनगरातील इंद्रायणीनगर मार्गावर पेट्रोलपंपाजवळ दीड ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताची भीती आहे.
रस्ता ओलांडणे धोकादायक
भोसरीतील धावडेवस्तीमध्ये भैरवनाथ विद्यालय आहे. इंद्रायणीनगरात महापालिकेचे वैष्णोमाता प्राथमिक विद्यालय आहे. येथे चक्रपाणी वसाहत, सद्गुरूनगर यासह महामार्गाच्या पूर्वेकडील विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. त्यांना रस्ता ओलांडावा लागतो. मात्र, तेथे पादचारी पूल नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना कसरत करावी लागत आहे.
नाशिक महामार्गावर साइडपट्ट्या भरलेल्या नाहीत. तेथे वाहन उतरल्यास पुन्हा रस्त्यावर येण्यासाठी कसरत करावी लागते. दुचाकी घसरून अपघाताच्या घटनाही घडत आहे. त्यामुळे महापालिकेने साइडपट्ट्यांसह लगतचे खड्डेही बुजविले पाहिजेत.
- रवि तायडे, वाहनचालक.
पुणे-नाशिक महामार्गालगत कामे करण्यासाठीच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देणार आहोत. साइडपट्ट्या आणि खड्डे लवकरच बुजविण्यात येणार आहेत.
- सुभाष घंटे, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी, राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण.
रस्त्याच्या सहापदरीकरण कामात इंद्रायणीनदी ते चाकणपर्यंतची अतिक्रमणे काढण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर भोसरीतील अतिक्रमणे काढून साइडपट्ट्या आणि रस्त्यालगतचे खड्डे बुजविण्यात येतील. येत्या पंधरा दिवसांत या कामाला सुरूवात होईल.
- दिलीप शिंदे, उपअभियंता, राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण
फोटो
BHS25B02609, BHS25B02610
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

