भोसरी, दिघी, इंद्रायणीनगरात विजेचा लपंडाव

भोसरी, दिघी, इंद्रायणीनगरात विजेचा लपंडाव
Published on

भोसरी, ता. ९ ः ऐन उन्हाळ्यात इंद्रायणीनगर, दिघी, भोसरी परिसरातील काही भागांतील विद्युत पुरवठा ऐन उन्हाळ्यात अनेकदा तास न तास खंडीत होत आहे. त्याचा परिणाम दैनंदिन पाणीपुरवठ्याबरोबरच इतर कामकाजावर होत आहे. याशिवाय नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.
असह्य उकाड्याने नागरिकांना पंखे, वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवावी लागत आहे; तर बेकरी व हॉटेल व्यावसायिकांना दुधाचे पदार्थ नासू नये यासाठी शीतगृहे सुरू ठेवावी लागत आहेत. मात्र, असे असताना इंद्रायणीनगर, दिघी आणि भोसरी परिसरातील वारंवार खंडित होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
भोसरीतील इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक एक ते तीन आणि सातमध्ये सकाळी आठ वाजता खंडीत झालेला विद्युत पुरवठा सकाळी अकरा वाजता सुरळीत झाला. गेल्या रविवारी (ता. २) इंद्रायणीनगरातील जय गणेश साम्राज्य, गुरुविहार कॉलनी, पेठ क्रमांक दहामधील रात्री आठ वाजता खंडीत झालेला विद्युत पुरवठा रात्री अकरा वाजता सुरळीत झाला नव्हता. तर दिघीत बुधवारी (ता. ५) विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने अर्धा तास विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता. भोसरीतील खंडोबामाळमध्ये शनिवारी (ता. ८) दुपारी तीन वाजता; तर शुक्रवारी (ता. ७) रात्री साडेअकरा वाजता एक तास विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

दिघीत कमी दाबाने वीजपुरवठा
दिघीमध्ये काही भागांत कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे काही वेळेस अपुरा प्रकाश पडत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरातील विद्युत रोहित्रामधील एखाद्या फेजमध्ये बिघाड झाल्यास अशी अडचण येत असल्याचे महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. महावितरणमध्ये आता पुरेसे कर्मचारी भरले असल्याने त्याचप्रमाणे खासगी एजन्सीकडूनही काम करून घेतले जात आहे. त्यामुळे विद्युत पुरवठ्यामध्ये आलेला बिघाड तातडीने दुरूस्त करून घेतला जात असल्याचा दावा महावितरणद्वारे करण्यात आला.

दिघीतील नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे भविष्यात वीजेचीही मागणी वाढणार आहे. यासाठी दिघीतील बी. यु. भंडारी सोसायटीजवळ महावितरणचे उपकेंद्र सुरू करण्याचे विचाराधीन आहे. महावितरणद्वारे त्यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
- राजेश घोडे, सहायक अभियंता, महावितरण, नाशिक रस्ता कार्यालय

एखाद्या भूमिगत विद्युत केबलमध्ये बिघाड झाल्यास ती मोबाईल व्हॅनद्वारे शोधून दुरुस्तीनंतर आणखी कोठे बिघाड झालाय का ? हे पेट्रोलिंग करून शोधावे लागते. यामध्ये अर्धा ते पाऊण तास जाण्याची शक्यता असते. महावितरणचे कर्मचारी तातडीने विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी कार्यरत असतात.
- राहुल फालके, सहायक अभियंता, महावितरण, इंद्रायणीनगर

विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने ऑनलाइन काम करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. उन्हाळ्यात विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे उकाड्यामुळे घरी बसता येत नाही. विद्युत पुरवठा असाच खंडीत होत राहिल्यास कंपनीचे ऑनलाइन काम सोडण्याची वेळ येऊ शकते. विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते.
- चेतन पाटील, नागरिक, इंद्रायणीनगर

विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे विद्युत उपकरणे बंद राहिल्याने अडचण निर्माण होते. उकाड्यामुळे घरी बसणेही अवघड होते. आता उन्हाळ्याचा पारा वाढत चालल्यामुळे विद्युत पुरवठा चोवीस तास सुरळीत राहण्यासाठी महावितरणने प्रयत्न केले पाहिजेत.
- अंगद जाधव, नागरिक, दिघी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com