कचरा कुंड्या नव्हे; आवडते ‘सेल्फी पॉईंट’
संजय बेंडे - सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. १२ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ आणि ‘ई’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत काही भागांत उघड्यावरील कचऱ्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले होते. मात्र, महापालिकेद्वारे तेथे सुशोभिकरण करण्यात आले आहे. टाकाऊ वस्तूंपासून येथे विविध आकर्षक सजावट केल्याने कचरा कुंड्यांच्या जागा नागरिकांच्या कौतुकाचा विषय झाल्या आहेत. काही ठिकाणे ‘सेल्फी पॉईंट’ झाली आहेत. उघड्यावर कचरा टाकणेही बंद झाल्याने भोसरी परिसराचा प्रवास पुन्हा इंदूर पॅटर्नकडे सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे इंदूर पॅटर्न राबवत परिसरातील कचरा कुंड्या काढून परिसर कचरा कुंडीमुक्त केला आहे. मात्र, असे असतानाही घंटागाडी वेळेत न येणे, सकाळी लवकर कामावर जाणारे कामगार आणि रात्रीच्यावेळेस विविध विक्रेते, व्यापाऱ्यांद्वारेही टाकाऊ वस्तू उघड्यावर फेकून देण्यात येत होत्या. त्यामुळे काही ठिकाणच्या चौकाला कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त होऊन इंदूर पॅटर्नचा फज्जा उडाला होता. हे टाळण्यासाठी वारंवार कचरा टाकण्यात येणाऱ्या जागेवर महापालिकेने सूचनावजा इशारा देणारे फलकही लावले होते. मात्र त्याचा कोणताही परिणाम न होता फलकाखालीच कचरा टाकणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होऊन साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधीही पसरत होती.
कचऱ्यांच्या जागांची सजावट
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिद्वारे कचऱ्यांच्या जागांचे सुशोभिकरण करण्याची मोहीम हाती घेतली. तेथे विविध आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली. त्याचप्रमाणे वाहनांचे टाकाऊ टायर, लाकडाचे ओंडके, झाडाच्या कुंड्या आदींसह विविध वस्तूंपासून सजावट करण्यात आली. त्यामुळे तेथे कचरा टाकणे बंद झाले आहे. ही मोहीम संपल्यावर देखील परिसराच्या सुशोभीकरणाकडे महापालिकेने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले.
कुठे झाले सुशोभीकरण ?
‘क’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालय
प्रभाग क्रमांक २ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, कुमार प्रथम सोसायटी (दोन्ही जाधववाडी).
प्रभाग ६ : चक्रपाणी वसाहत रस्ता, प्रभाग क्रमांक ८ : राजवाडा, इंद्रायणीनगर (दोन्ही भोसरी).
प्रभाग क्रमांक ९ : रसरंग चौक, मासुळकर कॉलनी (पिंपरी).
‘ई’ प्रभाग क्षेत्रिय कार्यालय
प्रभाग क्रमांक ३ : लक्ष्मीनगर नाला, भीमनगर, गंधर्वनगरीजवळील चर्च (तीनही ठिकाणे मोशी).
प्रभाग क्रमांक ४ : बालाजी टीजवळ, काळे कॉलनी (दिघी). प्रभाग क्रमांक ५ : प्रियदर्शिनी हायस्कूल, गवळीनगर, आदर्श शाळेसमोर (दोन्ही दिघी रस्ता). प्रभाग क्रमांक ७ - चांदणी चौक, भोसरी.
मोरवाडी आयटीआय विद्यार्थ्यांद्वारे टाकाऊ पासून टिकाऊ कलाकृती बनविल्या जातात. त्यांच्या कलाकृती कचरा टाकणाऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी बसविण्याचा विचार आहे. चाळ मालकांशी बैठका घेऊन ओला-सुका कचरा स्वतंत्र कुंड्यांत ठेवण्यासाठी सांगण्यात येत आहे. या कुंड्यातील कचरा महापालिकेकडून उचलला जाईल.
- तानाजी दाते, सहायक आरोग्य अधिकारी, ‘क’ प्रभाग
कचऱ्याच्या जागांच्या सुशोभिकरणावर अधिक भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सौंदर्य टिकवण्यासाठी कायमस्वरुपी लक्ष दिले जाणार आहे. कचरा टाकण्यास गैरसोय होणाऱ्या नागरिकांसाठी घंटागाड्या दोन पाळ्यांमध्ये सुरू करण्याचा विचार आयुक्त स्तरावर सुरू आहे. परिसरात कचराच पडू नये यासाठी महापिलेकेचे नियोजन सुरू आहे.
- राजेश आगळे, ई प्रभाग क्षेत्रिय अधिकारी, भोसरी
भोसरीतील चांदणी चौक, प्रियदर्शनी शाळेजवळ कचरा टाकण्याच्या जागेचे सुशोभीकरण झाल्याने वातावरण आल्हादकारक झाले आहे. कचरा टाकणारी ठिकाणे चुकवत जावे लागत होते. मात्र आता सुशोभीकरणामुळे नागरिक अशा ठिकाणी रेंगाळू लागली आहेत. आकर्षक सजावटीमुळे तेथे फोटोही काढत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे.
- मधुकर भोसले, नागरिक, भोसरी
इंदूर पॅटर्न अन् गरजा
- परिसराची स्वच्छता दोन वेळेस करणे
- नागरिकांच्या सोयीनुसार घंटागाड्यांच्या फेऱ्या वाढविणे
- स्थापत्य-आरोग्य विभाग सुरू केल्यास आरोग्य विभागाचे काम अधिक सुलभ
- आरोग्य विभागाला जलनिस्सारण, स्थापत्य, पाणी पुरवठा विभागाचे सहकार्य मिळणे गरजेचे
- स्वच्छतेविषयी कामे जलद गतीने होण्यासाठी कामगारांची संख्या वाढविणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

