

भोसरी, ता. ४ ः इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील अॅथलेटिक ट्रॅक खेळाडूंसाठी सोमवारपासून (ता. ७) खुले होणार आहे. मात्र, २०२३ पासून ट्रॅकच्या दुरुस्तीचे महापालिकेने हाती घेतलेले काम अद्यापही सुरूच आहे. सध्या मैदानातील डी सेक्शनचे काम सुरू असून, ते येत्या आठवड्यात संपेल, अशी अपेक्षा आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात एकमेव अॅथलेटिक ट्रॅक आहे. २०१९ मध्ये कोरोना काळात दोन वर्ष बंद असलेला हा अॅथलेटिक ट्रॅक कोरोनानंतर सुमारे नऊ महिने सुरू राहिला. त्यानंतर मार्च २०२३ पासून नूतनीकरणासाठी बंद केलेला ट्रॅक मार्च २०२४ रोजी सुरू करण्यात आला. मात्र, निकृष्ट कामामुळे एक महिना सुरू राहिलेला हा ट्रॅक पुन्हा दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला होता. त्यानंतर सप्टेंबर २०२४ रोजी ट्रॅकच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली होती. ट्रॅकचे महापालिकेने काम पूर्ण केले. मात्र गोळाफेक, थाळी फेक, लांब उडी, उंच उडी, भाला फेक आदी खेळांसाठी असलेल्या डी सेक्शन मैदानाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. या कामासाठी हा ट्रॅक पुन्हा गेल्या महिन्यात बंद करण्यात आला होता. मात्र अद्यापही डी सेक्शनचे काम पूर्ण झालेले नाही. २०२३ ते २०२५ या दरम्यान हा ट्रॅक खेळाडूंसाठी साडेतीन महिने सुरू राहिला होता. त्यामुळे २०१९ ते २०२५ या सहा वर्षांच्या कालावधीत हा ट्रॅक जेमतेम एक वर्षच सुरू राहिला होता. त्यामुळे अॅथलेटिक खेळाडूंचे सरावाअभावी त्यांच्या खेळावर परिणाम होऊन ते जिल्हा, राज्य आणि देशपातळीवरील स्पर्धेत मागे राहिले.
‘‘संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील अॅथलेटिक रनिंग ट्रॅकचे काम पूर्ण झालेले असतानाही डी सेक्शनचे काम अपूर्ण असल्याचे कारण देत पिंपरी चिंचवड महापालिकेने हा ट्रॅक बंद केला होता. मात्र, आता अॅथलेटिक ट्रॅक सुरू होणार असल्याने आनंद आहे. आता पुन्हा महापालिका या-ना त्या कारणाने हा ट्रॅक बंद करणार नाही, एवढीच अपेक्षा आहे.
-एक अॅथलेटिक खेळाडू.
‘‘महापालिकेच्या क्रीडा विभागाला संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील अॅथलेटिक ट्रॅक सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे अॅथलेटिक ट्रॅकमधील डी सेक्शनच्या कामालाही सुरवात करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
-मनोज सेठिया, सहशहर अभियंता, स्थापत्य क्रीडा व उद्यान विभाग, महापालिका.
‘‘भोसरीतील इंद्रायणीनगरातील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील अॅथलेटिक ट्रॅक सुरू करण्यासाठीचे पत्र महापालिकेच्या स्थापत्य क्रीडा, उद्यान विभागाकडून प्राप्त झाले आहे. शुक्रवारी (ता. ४) या क्रीडा संकुलातील अॅथलेटिक ट्रॅकच्या बुकिंगला सुरवात झाली आहे. सोमवारपासून (ता. ७) हा अॅथलेटिक ट्रॅक खेळाडूंसाठी खुला करण्यात येणार आहे.
-अनिता केदारी, प्रभारी क्रीडा अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
महापालिकेचे दुर्लक्ष, खेळाडूंचे नुकसान
भोसरीतील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने दोन वर्षांपासून ट्रॅकच्या नूतनीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम अद्यापही संपण्याचे नाव घेत नाही. हा अॅथलेटिक ट्रॅक बंद राहिल्याने सरावाअभावी पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील होतकरू खेळाडूंचे प्रचंड नुकसान झाले आहे.
इंद्रायणीनगर, भोसरी : संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील ॲथलेटिक ट्रॅक.
फोटो ः 02728
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.