भोसरीत बारा बलुतेदारांचा आजही सन्मान

भोसरीत बारा बलुतेदारांचा आजही सन्मान

Published on

संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा

भोसरी, ता. १३ : भोसरीची वाटचाल झपाट्याने शहरीकरणाकडे होत असतानाही पूर्वापार चालत आलेल्या प्रथा- परंपरा भोसरी ग्रामस्थांनी जोपासल्यामुळे आजही ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सव पूर्वीसारखाच पारंपरिक पद्धतीने आणि तितक्याच उत्साहाने साजरा होत आहे. पूर्वापारपासून आजतागायत भोसरी ग्रामस्थांकडून बारा बलुतेदारांना मान दिला जातो. या कुटुंबांना देण्यात येणारा मान पिढ्या न पिढ्या चालत आल्याने उत्सवाची जुनी परंपरा आजही जिवंत आहे.
भोसरीतील श्री भैरवनाथ महाराज यांचा उत्सव १५ व १६ एप्रिल रोजी होणार आहे. भोसरीतील उत्सवात ‘श्रीं’च्या पालखीची छबिना मिरवणूक काढली जाते. उन्हाळ्यात हा उत्सव येत असल्याकारणाने छबिन्यातील ‘श्रीं’च्या मूर्तींना थंडाई वाहण्याचा मान भोसरीतील सोनार समाजातील फाकटकर कुटुंबाला दिला जातो. सध्या या कुटुंबातील सुभाष फाकटकर आणि सुरेश फाकटकर हे परंपरा पाळत आहेत. याशिवाय परीट कुटुंबाला परंपरागत देवाची काठी पूजनाचा मान आहे. सध्या या कुटुंबातील ज्ञानेश्वर दळवी ही परंपरा पाळत आहेत. दळवी वाड्यातून काठीची विधीपूर्वक पूजा करून ती ग्रामस्थांद्वारे भैरवनाथ मंदिरात भक्तिभावाने आणली जाते. त्या ठिकाणी ती उभी केली जाते. या काठीला पताका (वारकऱ्यांचा झेंडा) असते. पहिल्या पावसानंतर ही काठी काढली जाते.
छबिन्याची पालखी नेण्याचा मान हा कोळी समाजाला देण्यात येतो. हनुमान जयंतीच्या दिवशी छबिना पालखी निघते. कोळी समाजातील संतोष जाधव, भानुदास जाधव आणि संदीप जाधव सध्या ही परंपरा सांभाळत आहेत. चिंतामण लांडगे, रामदास लांडगे, कालिदास लांडगे, चैतन्य लांडगे ही लांडगे कुटुंबातील सध्याची पिढी देवाला चवरीने हवा देण्याची परंपरा पाळत आहेत. गावच्या देवाची पूजा अर्चा करण्याचा मान हा गुरव कुटुंबाला जातो. सध्या गुरव कुटुंबातील कैलास पानसरे आणि प्रशांत पानसरे ही पिढी ही परंपरा पुढे चालवत आहे.
पूर्वीच्या काळी विजेचे दिवे नसायचे. त्यामुळे देवाच्या आरतीला दिवट्याचा मान हा तेली समाजाला मिळाला आहे. तेली समाजातील बाळासाहेब शेलार, मोहन शेलार सध्या ही परंपरा भक्ती भावाने जपत आहेत. माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांच्या कुटुंबाला देवाच्या भगताचा पिढीजात मान मिळाला आहे. ही परंपरा भगत म्हणून सध्या ते जपत आहेत. त्याचप्रमाणे गावचे पंचांग पाहण्याचा मान ब्राह्मण समाजातील तिखे कुटुंबाला असून हेमंत तिखे ही परंपरा पुढे चालवत आहेत.

परंपरेत राजकीय हस्तक्षेप नाही
भोसरीने पिंपरी चिंचवड शहराला प्रभावशील राजकीय नेते दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात त्यांचा दबदबाही पूर्वीपासून राहिला आहे. मात्र गावजत्रेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे पुढारी गावाच्या परंपरागत चालत आलेल्या उत्सवात आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे ही परंपरा जशी पूर्वी आहे. तशीच आताही बदल न होता सुरू आहे.

भोसरी गावचा श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव केव्हा सुरू झाला हे निश्चितपणे सांगता येत नाही. तरीही भोसरी गावाच्या स्थापनेपासून हा उत्सव सुरूच आहे. उत्सवाची परंपरा एका पिढीने दुसऱ्या पिढीपर्यंत अखंडितपणे सुरू ठेवल्याने पूर्वी ज्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येत होता. तो आजही तसाच करण्यात येतो.
- भानुदास फुगे, व्यवस्थापक, श्री भैरवनाथ मंदिर, भोसरी


छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रत्येक गडाच्या पायथ्याशी कोळीवाडा आहे. मावळे व छत्रपती श्री शिवाजी महाराज कोळीवाड्यापर्यंत घोड्यावरून जायचे. तेथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना पालखीमधून गटावर नेण्याचा मान कोळी समाजाला मिळत होता. तसाच मान आजही गावांमध्ये देवाची पालखी नेण्याचा कोळी समाजाला मिळतो. यामुळे आमचे कुटुंबीय भारावून गेलेलो असतो.
- संतोष बबनराव जाधव, पालखी मानकरी

आमची देवावर श्रद्धा आहे. त्यामुळे पिढ्या न पिढ्या देवाची पूजा करण्याची चालत आलेली परंपरा गुरव कुटुंबीय आजही पाळत आहे. वर्षभर मंदिरात देवाची पूजा-अर्चा व स्वच्छता केली जाते. मात्र
यासाठी वर्षाला मिळणारे दीड हजार अगदीच कमी असल्याने मंदिराची देखभाल करणे अवघड होते.
- अॅड. प्रशात पानसरे, कैलास पानसरे, ग्रामस्थ, भोसरी

चवरी फिरवण्याचा मान आमच्या कुटुंबीयांना पिढ्या न पिढ्यापासून मिळत आला आहे. आम्ही उत्साहाने आणि आवडीने हे काम करत असतो. हा मान मिळतो याचा आम्हा कुटुंबियांना अभिमान आहे.
- रामदास लांडगे, ग्रामस्थ, भोसरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com