अप्रत्यक्ष हुंड्याच्या नवीन प्रथेला लगाम घालण्याची गरज

अप्रत्यक्ष हुंड्याच्या नवीन प्रथेला लगाम घालण्याची गरज
Published on

संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा

भोसरी, ता. २४ : सध्या मुलीच्या लग्नात नवऱ्या मुलाला वधूपित्याकडून महागड्या गाड्या, दागदागिने, मोबाईल्स, घड्याळे अशा विविध बहुमूल्य वस्तू दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे या वस्तू विवाहस्थळी सार्वजनिकपणे, ध्वनिक्षेपकाद्वारे सर्वांसमोर जाहीर केल्या जातात. परिणामी, या प्रकाराला प्रतिष्ठेचा भाग मानला जाऊ लागला आहे. मात्र विनासायास मिळालेल्या संपत्तीमुळे अनेकदा नवऱ्या मुलाच्या कुटुंबाकडून अधिक संपत्ती मिळविण्याच्या मोहाचे रुपांतर नंतर सुनेच्या मानसिक आणि शारीरिक छळाच्या रूपात समोर येते. त्यातूनच वैष्णवी हगवणे सारखी निष्पाप मुलगी बळी जाते. त्यामुळे अप्रत्यक्ष हुंडा देण्याच्या नवीन प्रथेला लगाम घालण्याची गरज असल्याची भावना समाजामधून व्यक्त होत आहे.
विवाहस्थळी नवऱ्याला देण्यात येणाऱ्या महागड्या वस्तू, चारचाकी, दुचाकी उघडपणे मांडल्या जातात. प्रतिष्ठित व्यक्तींमार्फत त्या नवऱ्या मुलास सुपूर्द केल्या जातात. मात्र, लग्नानंतर अनेक वेळा सूनबाईचा पैशापायी मानसिक आणि शारीरिक छळही होतो. या मागण्या पूर्ण करताना मुलीचा संसार टिकून राहावा यासाठी माहेरच्या मंडळींकडून तडजोड केली जाते. पण; हीच तडजोडनंतर मोठ्या छळाला कारणीभूत ठरते.
लग्न ही दोन कुटुंबांची सुंदर सामाजिक बांधिलकी असते. प्रतिष्ठेचं प्रदर्शन नव्हे; याचे भान दोन्ही कुटुंबांना येणे गरजेचे आहे. समाजाने एकत्र येऊन अशा प्रथांचा निषेध करायला हवा. जेणेकरून कोणतीही मुलगी सासरकडच्या धनलोभी प्रवृत्तीला बळी जाणार नाही.

लग्न समारंभ मुलीकडच्या कुटुंबियासाठी दिव्य ठरत आहे. लग्नात अप्रत्यक्षपणे सुरू असलेली हुंडा पद्धत बंद झाली पाहिजे. त्याचप्रमाणे आजकालच्या लग्नात मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तिलाही कमीतकमी एक तोळे सोने देण्याची प्रथा रुढ होत आहे. अमुकाने दिले म्हणजे आपणही दिले पाहिजे, अशी भावना रितसर प्रतिष्ठेची केली जात आहे. या पद्धतीला कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे.’
- भानुदास फुगे, स्थानिक नागरिक, भोसरी

‘बऱ्याच वेळा दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने वस्तू दिल्या घेतल्या जातात. कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यात काही गैर नाही. मात्र, सासरकडच्या मंडळींच्या अवास्तव मागण्या मुलीकडच्या मंडळींनी मान्य करू नयेत. त्याचप्रमाणे सासरकडून वारंवार मागण्या सुरू झाल्यास आणि त्या पूर्ण न झाल्यास मुलीचा त्या मागणीसाठी मानसिक, शारीरिक छळ होऊ शकतो. तसे घडल्यास त्या विरोधात योग्य त्या कायदेशीर मार्गाचा अवलंब मुलीकडच्या मंडळींनी केला पाहिजे.’
- ॲड. बाळासाहेब थोपटे, विधीज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com