कामगार, लघुउद्योजकांच्या कामावर ‘पाणी’

कामगार, लघुउद्योजकांच्या कामावर ‘पाणी’
Published on

भोसरी, ता. १ ः जोरदार पावसाने भोसरी एमआयडीसीतील काही रस्त्यांवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्यामुळे कामगार आणि लघुउद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, पावसाने उघडीप देऊन तीन दिवस झाले तरी काही रस्त्यांवर पावसाचे साचलेले पाणी कायम राहिले आहे. त्यामुळे कामगार आणि लघुउद्योजकांनी संताप व्यक्त केला आहे. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी त्यांच्यामधून होत आहे.
यंदा मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. त्याचप्रमाणे सखल भाग आणि रस्त्यांवर जागोजागी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहन चालक, कामगार आणि नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. गुरुवारपासून (ता. २९) पावसाने उघडीप दिली. त्यामुळे सखल भागांसह रस्त्यावरील पाण्याचा निचरा झाला. मात्र भोसरी एमआयडीसीतील एस ब्लॉक २३४/४४ श्रीकृष्ण इंडस्ट्रीजसमोरील रस्ता, एस ४९ ब्लॉकमधील ठाकूर इंडस्ट्रीज समोरील रस्ता, टेल्को रस्त्यावर सेंच्युरी एन्का प्रवेशद्वार आदींसह इतरही रस्त्यांवर पाणी साचून राहत असल्याने कामगार आणि लघुउद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे भोसरी एमआयडीसीतील पेठ क्रमांक सातमधील विश्वेश्वर चौक ते यशवंतराव चव्हाण चौक, ईएल ९ ब्लॉकमधील जीवायबी कंपनीसमोरील रस्ता, पेठ क्रमांक सातमधील नाल्यालगतचे अंतर्गत रस्ते, लांडेवाडीतील महिंद्रा सीआयआर कंपनीसमोरील रस्ता आदी भागांतील रस्त्यांसह एमआयडीसीतील अन्यही काही रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होत नसून दोन-तीन तास रस्त्यांवर पाणी साचून राहत आहे.

साचलेल्या पाण्यामुळे समस्या
- कामगारांना कामावर येण्यासाठी अडचणी
- कंपनीचा कच्चा व तयार माल ने-आण करणे अवघड
- जास्त दिवस पाणी साचून राहिल्यास पाण्याला दुर्गंधी
- डास व रोगजंतूंच्या वाढीमुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात

भोसरी एमआयडीसीतील पाणी साचून राहिलेल्या रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गावरील गाळ, कचरा काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाण्याचा निचरा होण्यासाठी गरज भासल्यास चर खोदण्यात येईल.
- बाळासाहेब शेटे, उपअभियंता (स्थापत्‍य), क प्रभाग क्षेत्रिय कार्यालय

पाऊस थांबल्यानंतरही दीड ते पाऊण फूट पाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने कंपनीत तयार होणारा मालाची ने - आण करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एस २३४/४४ ब्लॉकमधील रस्त्यावर पावसाचे पाणी साचून राहते आहे. महापालिकेने यावर कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे.
- दीपक सिंग, लघुउद्योजक, भोसरी एमआयडीसी

भोसरीतील रस्त्यांवर पावसात पाणी साचत असल्याने पाण्यातून दुचाकी नेल्यास बऱ्याचवेळा बंद पडण्याचा प्रकार घडतो. त्याचप्रमाणे कामाला जाण्यासाठी उशीर होतो. साचलेल्या पाण्याने रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याची भीती असते.
- राजाराम कवाडे, कामगार, भोसरी एमआयडीसी

रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामुळे कामावर जाण्यासाठी उशीर होतो. त्याचप्रमाणे कामावरून घरी जाण्यासाठीही उशीर होतो. पाण्यात पडण्याची भीती वाटते.
- विजया चव्हाण, कामगार, भोसरी एमआयडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com