भोसरी एमआयडीसीतील उद्योगधंदे ‘खड्ड्यांत’
संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. २३ ः भोसरी एमआयडीसीतील प्रमुख रस्ते प्रशस्त असले तरी विविध अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याने लघुउद्योजकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांत पडून कामगार जखमी होत आहेत. तर कंपनीमध्ये माल ने-आण करण्यासाठी लघुउद्योजकांना कसरत करावी लागत आहे. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी लघुउद्योजक आणि वाहन चालकांमधून होत आहे.
भोसरी एमआयडीसीमध्ये अनेक लहान-मोठे उद्योगधंदे वसले आहेत. लघुउद्योजकांद्वारे कोट्यवधी रुपयांचा कर पिंपरी चिंचवड महापालिकेत भरला जातो. तरीही महापालिका एमआयडीसी परिसरात नागरी सुविधा पुरविण्यास अपयशी ठरली आहे. भोसरी एमआयडीसीला विविध समस्येने ग्रासलेले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची समस्या लघुउद्योजकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
भोसरी एमआयडीसीतील संकेत हॉटेल ते मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, यशवंतराव चव्हाण चौक ते विश्वेश्वर चौक, जे ब्लॉकमधील मसाला काटा ते पवना शाळेजवळ, जे ब्लॉकमधील भेल आप्ट्रॉनिक कंपनी ते दोस्ती क्रेनपर्यंतच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण झाल्याने हे रस्ते प्रशस्त झाले आहेत. त्याचप्रमाणे जे ब्लॉकमधील डब्ल्यू १३८ ते डबल्यू १६२ पर्यंतच्या रस्त्याचे सध्या सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे. एमआयडीसीतील हे प्रमुख रस्ते ऐसपैस झाले असले तरी अंतर्गत रस्त्यांकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याची ओरड लघुउद्योजकांची आहे.
कुठे आहेत खड्डे ?
भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉकमधील प्लॉट क्रमांक २२०, २२८, ४७६, ५३६, डब्ल्यू ब्लॉकमधील प्लॉट क्रमांक १७८, १८१, २०६, २१२, २३१, २६७, एस ब्लॉकमधील प्लॉटक्रमांक १, डब्ल्यू १६२,डब्ल्यू १६७ए, इएल ब्लॉकमधील प्लॉट क्रमांक ३१, इंद्रायणीनगरातील पेठ क्रमांक दहामधील प्लॉटक्रमांक १०६, १२५, १५७ आदी भाग.
काय आहेत समस्या ?
- खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावून वाहतूक कोंडी
- वाहतुकीसाठीचा वेळ वाढून इंधनाचा अपव्यय
- कामगारांना कामावर जाण्यासाठीही विलंब
- पाऊस झाल्यावर रस्त्यावर पाणी साचून राहणे
- पाण्यामुळे खड्डा दिसत नसल्याने अपघाताचे प्रकार
- सतत खड्डेमय रस्त्यावरील प्रवासाने कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास
- कंपनीत माल ने-आण करताना लघुउद्योजकांची कसरत
- परदेशातून कंपनी भेटीसाठी येणाऱ्या पाहुण्यांकडून लघुउद्योजकांना नकारात्मक प्रतिसाद
महापालिकेच्या आरोग्य, अतिक्रमण आणि स्थापत्य विभागाच्या पदाधिकाऱ्यांद्वारे एमआयडीसीमध्ये फेरफटका मारताना कंपनीच्या बाहेर कोणत्या वस्तूंचे अतिक्रमण आढळल्यास दंडाची पावती फाडली जाते. मात्र, त्यांना रस्त्यावरील खड्डे दिसत नाहीत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एमआयडीसीतील रस्त्यांवर वाहतूक कोंडीही होते. याविषयी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे वारंवार लेखी आणि तोंडी तक्रार करूनही कोणती कार्यवाही होताना दिसत नाही.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना
भोसरी एमआयडीसी रस्त्यावरील खड्ड्यांत भंगार मालाची वाहतूक करणारी वाहने आदळून लोखंडी बार, खिळे रस्त्यावर पडतात. त्यामुळे वाहने पंक्चर होतात. रात्रीच्यावेळेस एमआयडीसीतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अंधार असतो. त्यामुळे वाहनचालक, कामगार रस्त्यावरील खड्ड्यांत पडून जखमी होत आहेत. महापालिका आणि महापालिकेचा उद्योग कक्षाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे लघुउद्योजकांच्या समस्या वाढल्या आहेत.
- अभय भोर, अध्यक्ष, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन
एस डब्ल्यू-१६८ मधील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये कामगार वारंवार पडून जखमी होत आहेत. पाऊस पडल्यावर पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्ड्यात मोठ्या प्रमाणात जमा होते. पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डा दिसत नसल्याने वाहनांना अधिक अपघात होत आहेत. ही समस्या महापालिकेने तातडीने सोडविणे गरजेचे आहे.
- तुकाराम बांगर, लघुउद्योजक, भोसरी एमआयडीसी
भोसरी एमआयडीसीतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरूच आहे. याचा दररोज आढावाही घेतला जात आहे. काही लघुउद्योजकांनी नैसर्गिक नाल्याच्या परिसरामध्ये अतिक्रमण करून पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण झाल्याने काही रस्त्यांवर पाणी साचते. अशा लघुउद्योजकांना महापालिकेने नोटिसाही दिल्या आहेत.
- सुनीलदत्त नरोटे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), क प्रभाग क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.