अनधिकृत पार्किंगमुळे रस्ते जाम, पादचाऱ्यांनाही धोका

अनधिकृत पार्किंगमुळे रस्ते जाम, पादचाऱ्यांनाही धोका

Published on

भोसरी, ता. ९ ः भोसरी, इंद्रायणीनगर आणि दिघी परिसरातील काही रस्त्यांवर अनधिकृतपणे खासगी बससह अवजड वाहने लावण्यात येत आहेत. काही रस्त्यांच्या वळणावरही वाहने लावण्यात येत असल्याने वाहने वळविताना वाहन चालकांना धोकादायक ठरत असून वाहतूक कोंडीही होत आहे. ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी वाहन चालक आणि नागरिकांमधून होत आहे.
अनधिकृतपणे खासगी प्रवासी बस, अवजड वाहनांसह चारचाकी वाहने उभी केल्याने रस्त्याची रुंदी कमी होत असून वाहनांच्या कोंडीतही भर पडत आहे. भोसरीतील लांडेवाडीतील दत्त मंदिर ते पुणे - नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा खासगी प्रवासी बस, इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौक ते पुणे - नाशिक महामार्गाला जोडणारा रस्त्यावर दुतर्फा अवजड वाहने लावली जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावण्यात येत असल्याने हा रस्ता पादचारी आणि वाहन चालकांसाठी धोकादायक झाला आहे. काही रस्त्यांवर स्थानिक नागरिकांद्वारे कायमस्वरुपी वाहने लावण्यात आलेली दिसतात. रस्त्याच्या डांबरीकरणावेळीही ही वाहने काढण्यात येत नसल्याने रस्त्याचे डांबरीकरण अर्धवट झालेले दिसते.

कुठे उभी असतात वाहने ?
भोसरी : लांडेवाडीतील दत्तनगर ते पुणे - नाशिक महामार्गापर्यंतचा रस्ता, दिघी रस्त्यावर सिद्धेश्वर हायस्कूल चौक ते गंगोत्री पार्क, कै. सखूबाई रामभाऊ गवळी उद्यानाजवळून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा रस्ता, पुणे - नाशिक महामार्गावर ऐतिहासिक प्रवेशद्वाराजवळ (संध्याकाळी), कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळजवळून सहल केंद्राकडे जाणारा रस्ता.

दिघी : आळंदी - पुणे पालखी मार्गावर मॅगझीन चौक ते दत्तनगर, भारतामातानगर ते गायरानातून आळंदी रस्त्याला जोडणारा रस्ता, आळंदी रस्त्यावर फुगे वस्ती ते मॅगझीन चौक, संत निरंकारी भवनाजवळून सीएमई भिंतीजवळून दिघीकडे जाणारा रस्ता.

इंद्रायणीनगर : टेल्को रस्त्यावरून इंद्रायणीनगर कॉर्नरकडून इंद्रायणीनगरकडे जाणारा रस्ता, इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौक ते पुणे - नाशिक महामार्गाला जोडणारा रस्ता, जय गणेश साम्राज्य जवळून संतनगर चौक, विश्वेश्वर चौक ते यशवंतराव चव्हाण चौक, यशवंतराव चव्हाण चौक ते श्री तिरुपती बालाजी चौक.


रस्त्याच्याकडेला थांबविण्यात येणाऱ्या वाहन चालकांवर नियमित कारवाई सुरू आहे. त्यामुळे लांडेवाडीतील रस्त्याच्याकडेला लागणाऱ्या बसची संख्या कमी झाली आहे. पुणे - नाशिक महामार्गावरून इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उंचीरोधक लोखंडी कमान लावण्यात येणार असल्याने या रस्त्यावर अवजड वाहने थांबणे बंद होईल.
- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस वाहतूक विभाग

दिघीतील मॅगझीन चौक ते जुना जकात नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर लावण्यात येणाऱ्या वाहनांवर रोज कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांद्वारे वाहनांच्या मालकांशीही संपर्क करून त्यांना येथे वाहने न लावण्यास सांगितले जात आहे. या रस्त्यावर एकच वाहन सतत लावण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या वाहन चालकांवर कडक कारवाईचा बडगा उचलला जाईल.
- सतीश नांदुरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दिघी-आळंदी पोलिस वाहतूक विभाग

सेवा रस्त्यावर वाहने
दिघीतील मॅगझीन चौक ते दत्तनगरपर्यंतच्या सेवा रस्त्याच्याकडेला ओपन जीम असल्याने मोठ्या प्रमाणात येथे नागरिक व्यायामासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी सकाळी- संध्याकाळी येतात. सेवा रस्त्यावर वाहने लावण्यात येत असल्याने नागरिकांना रस्त्यामधून चालावे लागत असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

रस्त्याच्याकडेला लावण्यात येत असलेल्या वाहनांमुळे इंद्रायणीनगरातील श्री तिरुपती बालाजी चौकात वाहतूक कोंडीत भर
पडत आहे. रस्त्याच्याकडेला लावण्यात येत असलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांद्वारे कडक कारवाई झाली पाहिजे.
- सतीश थिटे, स्थानिक नागरिक, इंद्रायणीनगर, भोसरी

BHS25B03089

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com