चक्रपाणी वसाहत, आदर्शनगरला विजेचा ‘झटका’
भोसरी, ता. १० ः भोसरीतील चक्रपाणी वसाहत आणि दिघी रस्त्यावरील आदर्शनगर परिसरात विजेचा वारंवार लपंडाव सुरू आहे. आदर्शनगर परिसरात पाणीपुरवठ्याच्या दिवशीच वीज गायब होत असल्याचे नागरिकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय कधी कमी दाबाने तर कधी उच्च दाबाने पुरवठा होत असल्याने अनेक घरांतील विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. शास्त्री चौक परिसरात चार दिवसांपासून वीजपुरवठा झालेला नाही.
मागील चार महिन्यांपासून चक्रपाणी वसाहतीमध्ये वीजेचा लपंडाव सुरू आहे. वसाहतीतील हनुमान कॉलनी क्रमांक एक ते चारमधील अनेक नागरिकांच्या पाण्याच्या मोटारी, एलइडी बल्ब, फ्रीज आदींचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात रवी टोपे यांची पाण्याची मोटार; तर गणेश थिटे यांच्या घरातील एलईडी बल्ब उडाले. त्याचप्रमाणे बऱ्याच भाडेकरूंच्या घरांतील विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होऊन त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला आहे. गेल्या आठवड्यात चक्रपाणी वसाहत परिसरातील काही केबल महावितरणद्वारे बदलण्यात आल्या. मात्र, महावितरणने जोड दिलेल्या केबल वारंवार नादुरुस्त होत असल्याने येथील नागरिकांची समस्या सुटायचे नाव घेत नाही.
पाणीपुरवठ्यावर परिणाम
भोसरीतील दिघी रस्त्यावरील आदर्शनगर परिसरातही विजेची वारंवार ये-जा सुरू आहे. महापालिकेद्वारे दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. मात्र आदर्शनगर परिसरात पाण्याच्या दिवशीच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जमिनीतील टाकीचे पाणी इमारतीच्या वरच्या टाकीत पोचविता येत नाही. त्यामुळे नागरिकांना वापरासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. काही नागरिक ‘वर्क फ्रॉम होम’ काम करतात. मात्र, वीज गेल्यास ही यंत्रणा बंद पडून कामही बंद होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कुठे चालू लपंडाव ?
चक्रपाणी वसाहतीतील हनुमान कॉलनी क्रमांक एक ते चार, श्रीदत्त कॉलनी, गवळीनगर, श्रम कॉलनी, विवेकानंद कॉलनी, उत्कर्ष मंडळ. दिघी रस्त्यावरील आदर्शनगर.
चार दिवसांपासून शास्त्री चौक अंधारात
चक्रपाणी वसाहतीतील शास्त्री चौकामधील विजेची एक फेज बंद असल्याने गणेश कॉलनी क्रमांक एक ते तीन, ओम शांती बिल्डिंग परिसरातील विद्युत पुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे येथील सुमारे चारशे घरात अंधारात आहे. सोमवारी (ता. ७) पहाटे पाचला येथील वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणद्वारे खोदकाम सुरू आहे. मात्र, नादुरुस्त केबल सापडत नसल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचे येथील नागरिक लहु शेलार यांनी सांगितले. विजेअभावी पिठाची गिरण चार दिवसांपासून बंद ठेवावी लागल्याचे मारूती राऊत यांनी सांगितले. तक्रार करूनही महावितरणद्वारे दखल घेतली जात नसल्याने महावितरण विरुद्ध मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
माझ्या घरातील पाण्याची मोटार २४ जूनला जळाली. ती दुरुस्त करून आणल्यावर पुन्हा २६ जूनला जळाली. आता आठ हजार रुपयांची नवीन मोटार आणली आहे. त्याचप्रमाणे एलईडी बल्बही जळाल्याने आर्थिक नुकसान झाले आहे.
- शिवाजी जगताप, हनुमान कॉलनी, चक्रपाणी वसाहत
गेल्या चार दिवसांपासून आमच्या परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. विजेच्या लपंडावाने बुधवारी (ता. ९) माझ्या घरातील फ्रीज नादुरुस्त झाला, दोन एलइडी बल्ब उडाले. मात्र अद्यापही विजेच्या लपंडावापासून सुटका झालेली नाही.
- अमोल अरगडे, गुरुदत्त कॉलनी, गवळीनगर
चक्रपाणी वसाहतीमधील हनुमान कॉलनी क्रमांक एकमधील केबलमध्ये जागोजागी जोड असल्याने विद्युत दाब त्या भागात कमी - जास्त होत आहे. त्यामुळे विद्युत उपकरणांमध्ये बिघाड झाल्याचे दिसते. मात्र रविवारी (ता. ६) येथील विद्युत केबल बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथील ही समस्या सुटली आहे. त्याचप्रमाणे हनुमान कॉलनी क्रमांक चारमध्येही पाहणी करून तेथील केबल बदलण्यात येणार आहे. भोसरीतील दिघी रस्त्यावरील आदर्शनगरमध्ये पाहणी करून तेथील विजेची समस्या सोडवली जाईल.
- राजेश घोडे, सहायक अभियंता, महावितरण, भोसरी विभाग
PNE25V30263
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.