बेशिस्त चालकांमुळे वाहतूक कोंडीची डोकेदुखी
भोसरी, ता. १७ ः पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) बीआरटीएस टर्मिनलजवळील बस थांब्यावर रिक्षा आणि इतर खासगी प्रवासी वाहने बेशिस्तपणे थांबविल्या जातात. त्यामुळे, मुळातच अरुंद असलेल्या या चौकात वाहनांची कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. रिक्षा चालकांमध्ये प्रवासी घेण्यासाठी स्पर्धा लागलेली असते. त्यावरुन वादावादीचेही प्रसंग घडतात. बस समोरील रिक्षा पुढे घेण्यावरून बस चालक आणि रिक्षा चालकांमध्येही काही वेळेला शाब्दिक चकमक उडत असते.
भोसरीतील बीआरटीएस टर्मिनलवरून पुणे, पिंपरी चिंचवडसह खेड, चाकण, राजगुरूनगर आदी भागांकडे बस ये - जा करतात. याच ठिकाणी एसटीचाही थांबा आहे. टर्मिनलच्या चार पदरी रस्त्याच्या दोन पदरी भागावर बस थांबविल्या जातात. एक पदरी भागासह बसच्या मार्गावरही रिक्षा आणि इतर खासगी प्रवासी वाहने बेशिस्तपणे उभी केली जातात. बऱ्याच वेळा पीएमपीमधील कर्मचाऱ्यांना बस पुढे नेण्यासाठी बसच्या मार्गात असणाऱ्या रिक्षांना बाजूला घेण्याची विनंती ध्वनिक्षेपकाद्वारे करावी लागते. इतर वाहनांसाठी एक पदरी रस्ताच शिल्लक राहतो. त्याचप्रमाणे बीआरटीएस टर्मिनलजवळच एसटी थांबाही आहे. या थांब्याच्या समोरच रिक्षा थांबत असल्याने एसटीला थांब्याची एक मार्गिका सोडून थांबावे लागते. त्यामुळे प्रवाशांचीही पळापळ होते. संध्याकाळच्यावेळेस बीआरटीएस टर्मिनल ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंतच्या पदपथावर विविध विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली असतात. येथे खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक त्यांची वाहने रस्त्याच्याकडेलाच लावतात. त्यामुळेही या रस्त्याची रुंदी कमी होते. याचा परिणाम बीआरटीएस टर्मिनलजवळील रस्त्यावरील वाहतुकीवर होतो.
काय करता येईल ?
- तळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत रिक्षा, खासगी प्रवासी वाहनांसाठी जागा उपलब्ध करणे
- सर्व खासगी प्रवासी वाहने, रिक्षा एका ओळीत थांबतील असे नियोजन करणे
- फक्त नोंदणीकृत आणि परवानाधारक वाहने लागतील याकडे लक्ष देणे
- खासगी प्रवासी वाहन चालक, रिक्षा चालकांच्या संघटनांमध्ये समन्वय साधणे
अंतर्गत थांब्यावरही रिक्षा
भोसरीतील बीआरटीएस टर्मिनलची डावीकडील बाजू पुणे - नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आहे. तर उजवीकडील बाजूकडे बीआरटीएसचा अंतर्गत रस्ता आहे. या ठिकाणी पीएमपीच्या बस लावल्या जातात आणि शहराच्या इतर भागांत सोडल्या जातात. या भागातही काही रिक्षाचालक रिक्षा घेऊन थांबत असल्याचे दिसते. त्यावरून रिक्षा चालकांची मुजोरी दिसून येत आहे.
भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील थांब्यासाठी दिलेली जागा रिक्षा चालकांना मान्य नाही. बीआरटीएस टर्मिनलजवळील रस्त्यावर रिक्षा थांब्यासाठी फलक लावण्यात येतील. या जागेव्यतिरिक्त इतरत्र थांबणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येईल.
- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस वाहतूक शाखा
रिक्षाचालकांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे. इतर वाहनांना अडथळा होऊ नये आणि अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणेही गरजेचे आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांद्वारे रिक्षा चालकांसाठी थांब्यांचे नियोजन होणे गरजेचे आहे. रिक्षा थांब्याचे नियोजन झाल्यावर रिक्षा बेशिस्तपणे थांबणार नाहीत.
- काशिनाथ नखाते, अध्यक्ष, कष्टकरी संघर्ष रिक्षा महासंघ, पिंपरी चिंचवड
रिक्षा व खासगी प्रवासी वाहने थांबल्यामुळे बीआरटीएस टर्मिनलजवळून पुढे जाणे कसरतीचे ठरत आहे. बस, खासगी बससह इतर मोठ्या वाहनांच्या कोंडीतून बाहेर पडणे धोक्याचे ठरत आहे.
- दशरथ बनबरे, प्रवासी, राजगुरूनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.