ग्रंथालय, संगीत विद्यालयासाठी आरक्षित भूखंड विक्रीस
संजय बेंडे ः सकाळ वृत्तसेवा
भोसरी, ता. ७ ः पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) भोसरीतील इंद्रायणीनगरातील ग्रंथालय व संगीत विद्यालयासाठी आरक्षित भूखंड विक्रीसाठी काढला आहे. मात्र, त्याची विक्री न करता तो पीएमआरडीएने विकसित केल्यास संगीतप्रेमी आणि वाचनप्रेमींची चांगली सोय होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे या भूखंडाची विक्रीसाठीची निविदा प्रक्रिया रद्द करण्याचीही मागणी होत आहे.
भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये शासकीय ग्रंथालय नाही. त्याचप्रमाणे परिसरात शासकीय संगीत विद्यालयही नाही. त्यामुळे तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून सुमारे १५ वर्षांपूर्वी भोसरीतील इंद्रायणीनगरमधील पेठ क्रमांक दोनमधील सार्वजनिक सुविधा भूखंड ब येथील एक हजार चौरस मीटरची (दहा गुंठे) जागा ही सार्वजनिक ग्रंथालय आणि संगीत विद्यालयासाठी राखीव करण्यात आली. मात्र, हा भूखंड १५ वर्षांनंतरही विकसित करता आलेला नाही.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएद्वारे सार्वजनिक सुविधेसाठीचे विविध भूखंड विकसित करून नागरिकांसाठी खुले केले जातात. काही वेळा ही सुविधा केंद्रे खासगी आस्थापनेकडे चालविण्यासाठी दिले जातात. मात्र सदरची जागा शासनाने विकसित केल्यास खासगी आस्थापनेवरही शासनाचा अंकुश राहत असल्याने नागरिकांना चांगली सुविधा मिळण्याची संधी उपलब्ध होते. मात्र, सार्वजनिक सुविधेचा भूखंड खासगी झाल्यास त्या ठिकाणी चांगली सुविधा मिळेलच की नाही याची शाश्वती नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मागणीवर कार्यवाही नाही
सुमारे सात वर्षांपूर्वी बहुजन हिताय बहुजन सुखाय सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाने तत्कालीन प्राधिकरणाकडे हा भूखंड विकसित करण्याची मागणी केली होती. त्यावर प्राधिकरणाने हा भूखंड पिंपरी चिंचवड महापालिकेने मागणी केल्यास त्यांना हस्तांतरण करता येईल सांगितले होते. त्यानुसार महापालिकेने पाच वर्षांपूर्वी पीएमआरडीएकडे भूखंडाच्या हस्तांतराची मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही.
पीएमआरडीएने हा भूखंड विकसित करावा. अन्यथा विकसनासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे हस्तांतरीत करावा. पीएमआरडीएची स्थापनाच लोककल्याणासाठी झाली आहे. त्यामुळे पीएमआरडीए ही नफा कमवणारी संस्था नाही. सार्वजनिक हिताचा विचार करत या भूखंडाचे होणारे खासगीकरण पीएमआरडीएने थांबविले पाहिजे.
- गिरीश वाघमारे, संस्थापक अध्यक्ष, बहुजन हिताय बहुजन सुखाय सार्वजनिक ग्रंथालय
समाजातील अनेक विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असतात. मात्र आर्थिक परिस्थिती आणि योग्य संधी उपलब्ध न झाल्याने त्यांची उपजत कला विकसित होत नाही. त्यामुळे पीएमआरडीएने भोसरीतील इंद्रायणीनगरातील सार्वजनिक संगीत विद्यालयाचा भूखंड विकसित केल्यास सर्वसामान्य कलाप्रेमी विद्यार्थ्यांना त्याचा अधिक लाभ होईल.
- प्रियांका लोहारकर, संगीत विशारद
पीएमआरडीएने इंद्रायणीनगरातील भूखंड इ लिलावास काढला आहे. मात्र, हा भूखंड सार्वजिनक ग्रंथालय आणि संगीत विद्यालयासाठी राखीव असल्याने हा भूखंड घेणाऱ्यास त्याच कारणासाठी तो विकसित करण्याची अट आहे. त्याचा वेगळ्या कारणासाठी वापर करता येणार नाही. भूखंड विक्रीच्या लिलावातून आलेली रक्कम पीएमआरडीएद्वारे इतर विकास प्रकल्पाच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे.
- हिंमत खराडे, उपायुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.