रथात आरूढ गणराय अन् ढोल-ताशांचा गजर

रथात आरूढ गणराय अन् ढोल-ताशांचा गजर

Published on

भोसरी, ता. १६ : आकर्षक सजावटीतील रथ आणि विद्युत रोषणाई...ढोल-ताशांचा गजर...मर्दानी खेळ...तरुणाईचा उत्साह...पावसाच्या हलक्या सरी...आणि गणरायाचा जयजयकार...अशा वातावरणात भोसरी परिसरात श्री गणेशाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला.

भोसरी गावठाणातील बापूजीबुवा चौकात संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गणपती विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. पीएमटी चौकाजवळ महामार्गालगत श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ उभारलेल्या स्वागत मंडपात पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे मंडळांच्या अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले. या वेळी ‘इ’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, प्रशासन अधिकारी मुरलीधर बगाड, कार्यकारी अभियंता शिवराज वाडकर, संतोष दुर्गे, शैलेंद्र चव्हाण, राजीव बटुळे आदी उपस्थित होते.
सायंकाळी पाच वाजता कानिफनाथ मित्रमंडळाचे सर्वप्रथम आगमन झाले. फुलांच्या आकर्षक महालात गणरायाची मूर्ती विराजमान होती. सव्वापाच वाजता संत ज्ञानेश्वर भाजीमंडई गणेश मंडळाचे आगमन झाले. पठारे-लांडगे तालीम व्यायाम मंडळाने आकर्षक आकर्षक विद्युतरुपी ‘गजमहल’ तयार केला होता. लांडगे लिंबाची तालीम मंडळाने आकर्षक पुष्प महलात श्री गणेशाची मिरवणूक काढली. फुगे-माने तालीम मंडळाने आकर्षक ‘सुवर्ण विद्युतमहाल’ तयार केला होता. समस्त गव्हाणे तालीम मंडळाने विसर्जन मिरवणुकीत ‘महाकाली’ रथ तयार केला होता. छत्रपती श्री शिवाजी महाराज तरुण मित्र मंडळाने त्रिशूळधारी शंकराची भव्य मूर्ती तयार केली होती. नाथसाहेब मित्र मंडळाने पुष्पमहाल तयार केला होता.
नरवीर तानाजी तरुण मंडळाने भव्य असा ‘गजमहाल’ तयार केला होता. नवज्योत मित्रमंडळाने विठ्ठल रुक्मिणी आणि संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या भव्य मूर्ती लक्ष वेधत होत्या. आदर्श मित्रमंडळाने विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या मूर्ती फुलांमध्ये सजविल्या होत्या. लोंढे तालीम मंडळाने ‘शिवतांडव’ या रथावर शंकराची मूर्ती बसविली होती. श्रीराम मित्रमंडळाने गाय आणि वासराच्या प्रतिकृतीसह चौदा फुटी हनुमानाची मूर्ती सहभागी केली होती. खंडोबा माळ मित्रमंडळाने डिजिटल स्क्रीनच्या सहाय्याने गणपतीला सजविले होते. कै. दामूशेठ गव्हाणे मंडळाने ‘महाकाल’ रथ सादर केला. नवमहाराष्ट्र तरुण मंडळाने आकर्षक फुलांनी सजवलेला ‘सूर्यरथ’ आणि त्यापुढे पुष्परचनेतील अश्व लक्ष वेधत होते.
मधले फुगे तालीम मंडळाने विद्युत रोषणाईतील महाल साकारला होता. माळीआळी मित्रमंडळाने आरूढ केलेल्या विठ्ठल-रुक्मिणीसह संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या भव्य मूर्ती आकर्षक ठरत होत्या. जय मल्हार मित्र मंडळाने भव्य अशी शंकराची मूर्ती तयार केली होती. वीर हनुमान मित्र मंडळाने आकर्षक विद्युत महाल तयार केला होता. लांडगेब्रदर्स ॲण्ड फ्रेंड्स सर्कलद्वारे अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार केली होती. विनर्स मित्र मंडळाने आकर्षक विद्युत महाल साकारला होता.

पर्यावरणपूरक विसर्जन मिरवणूक
या वर्षी सर्वच गणेश मंडळांनी गुलाल आणि भंडाऱ्याची उधळण टाळत पर्यावरणपूरक विसर्जन मिरवणूक आयोजित केली. तसेच काही वगळता बहुसंख्य मंडळांनी डीजेचा वापर टाळत ढोलताशा पथकांना पसंती दिल्याचे दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com