दिघी परिसरातील भूमिगत विद्युत तारांचे काम अपूर्ण

दिघी परिसरातील भूमिगत विद्युत तारांचे काम अपूर्ण

Published on

भोसरी, ता. ७ ः दिघी गावठाण आणि परिसरातील काही भागांत विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम सात वर्षानंतरही अपूर्ण अवस्थेतच आहे. त्यामुळे विद्युत खांबांवर तारांचे जाळे तयार झाले आहे. जोराचा वारा आल्यावर तेथे ठिणग्या उडून विद्युत पुरवठा खंडित होत आहे. काही भागांत विद्युत तारांचे जाळे इमारतीतील गॅलरीला खेटून गेल्याने विजेचा धक्का बसून अपघात होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे.
दिघी परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम महावितरणद्वारे २०१७-१८ मध्ये सुरू करण्यात आले. या योजनेअंतर्गत दिघीतील अत्यंत वर्दळीच्या आदर्शनगर रस्त्यावरील विद्युत खांबांवरील विद्युत तारांचे जाळे काढून भूमिगत विद्युत तारा टाकण्यात आल्या. त्यानंतर या भागात भूमिगत विद्युत तारांद्वारे नागरिकांना विद्युत पुरवठा करण्यात आला. मात्र, अद्यापही दिघी गावठाणासह काही भागांतील विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम रखडले आहे. भूमिगत तारांद्वारे विद्युत पुरवठा करणे अद्याप शक्य झालेले नाही. या भागांमध्ये सुमारे दहा हजार नागरिकांची लोकवस्ती आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या भागातील नागरिकांना भूमिगत विद्युत तारांद्वारे पुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. महावितरणद्वारे दिघीतील सर्व ठिकाणच्या विद्युत तारा भूमिगत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय गायकवाड, रोहित शिंदे, प्रतीक वाघमारे, साहिल शेख, गजानन भोसले आदी नागरिकांनी केली आहे.

मुख्य वाहिनीला जोडण्याचा विसर
दिघी गावठाणामध्ये भूमिगत विद्युत तारा टाकण्यात आल्या आहेत. मात्र, त्या मुख्य विद्युत वाहिन्यांना जोडल्या गेल्या नसल्याने अद्यापही दिघी गावठाणात ओव्हरहेड केबलद्वारेच विद्युत पुरवठा होत आहे. अशीच परिस्थिती दिघीतील इतरही काही भागांमध्ये पाहायला मिळते.


भूमिगत तारांची कामे पूर्ण
आदर्शनगर, चौधरी पार्क, गायकवाडनगर, विजयनगर, माऊलीनगर, श्रीराम कॉलनी, दत्तगडनगर, दत्तनगर, बी. यु. भंडारी, भारतमातानगर, गजानन महाराजनगर, साई पार्क.

कुठे काम अपूर्ण ?
सह्याद्री कॉलनी क्रमांक एक ते तीन, पोलिस कॉलनी, विकास कॉलनी, दिघी गावठाण, समर्थनगर, साई पार्क कॉलनी दोन.

ओव्हरहेड तारांमुळे समस्या
- वाऱ्यामुळे तारा हलल्याने ठिणग्या उडून विद्युत पुरवठा खंडित
- ठिणग्यांनी तारा जळण्याचे प्रकार
- विद्युत तारा घराजवळून गेल्याने नागरिकांच्या जीविताला धोका
- काही नागरिकांची बांधकामे रखडली
- काही विद्युत तारा झाडांवरून गेल्याने धोकादायक
- विद्युत तारा रस्त्यावर लटकत असल्याने वाहनांनाही अडथळा

तारांच्या जाळ्यांमुळे विद्रूपीकरण
शहरातील विद्युत तारांच्या जाळ्यामुळे होणारे विद्रूपीकरण आणि इतर समस्या सोडवण्यासाठी भूमिगत विद्युत तारा टाकण्यात आल्या. मात्र शहर परिसरात लावण्यात आलेल्या पथदिव्यांच्या खांबावर टीव्ही आणि नेटवर्क केबलचे जाळे पसरल्याने परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे.


दिघीतील विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. हा निधी प्राप्त झाल्यावर दिघीतील रखडलेल्या भूमिगत विद्युत तारांचे काम पूर्ण करण्यात येईल.
- अतुल देवकर, कार्यकारी अभियंता, महावितरण, भोसरी विभाग

पूर्वी विद्युत तारा टाकण्याचे काम महापालिकेद्वारे केले जात होते. मात्र, त्यामध्ये बदल होऊन आता विद्युत तारा टाकण्याचे काम महावितरणद्वारेच केले जाते. दिघीतील विद्युत तारांचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेद्वारे आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी महावितरणकडे पाठपुरावा केला जाईल.
- संतोष दुर्गे, कार्यकारी अभियंता, ‘ई’ क्षेत्रीय विद्युत विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

दिघीतील काही भागांत विद्युत जोड हे खांबांवरून दिल्याने विद्युत तारांचे जाळे तयार झाले आहे. त्यामुळे विजेचा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वाऱ्याने विद्युत तारांमध्ये ठिगण्या उडून त्या नादुरुस्त होतात. तारा विकत घेण्याचा खर्च नागरिकांना स्वतः करावा लागत आहे.
- के. के. जगताप, नागरिक, सह्याद्री कॉलनी, दिघी

BHS25B03286

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com