इंद्रायणीनगर मंडईतील गाळ्यांवर तळीरामांचा अड्डा

इंद्रायणीनगर मंडईतील गाळ्यांवर तळीरामांचा अड्डा
Published on

भोसरी, ता. ९ : इंद्रायणीनगरातील भाजी मंडईतील भाजी आणि फळे विक्रेत्यांनी वाहनतळाच्या जागेत दुकाने थाटली आहेत. तर मंडईतील गाळ्यांवर टवाळखोर, तळीराम आणि जुगाऱ्यांनी ताबा मिळविला आहे. चोरट्यांचाही वावर असल्याने फळे, विक्रेत्यांचा माल चोरीला जात आहेत. बऱ्याच वेळा दिवसाही तळीरामांचा ठिय्या असतो.
पिंपरी चिंचवड महापालिकेने इंद्रायणीनगर परिसरातील रस्त्यावरील भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यासाठी मिनी मार्केटजवळील पेठ क्रमांक दोनमध्ये भाजी मंडई बांधली. त्यामध्ये ७२ गाळे भाजी विक्रेत्यांसाठी तर फळ विक्रेत्यांसाठी १८ स्टॉल्सचे नियोजन करण्यात आले. या मंडईचे काम तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने २०१५ ला सुरू केले. ते २०१८ मध्ये पूर्ण केले. त्यानंतर या ना त्या कारणामुळे त्याचे उद्‍घाटन रखडले. सुमारे तीन वर्षांपूर्वी ही भाजी मंडई प्रत्यक्ष सुरू झाली. मात्र या मंडईची रचना योग्य नसल्याचे कारण देत भाजी आणि फळे विक्रेत्यांनी भाजी मंडईच्या वाहनतळामध्येच दुकाने थाटली आहेत. चोरट्यांचा वावर असल्याने फळे विक्रेत्यांची भाजी फळे चोरी जात आहेत. विशेष म्हणजे ज्या भाज्या, फळे महाग आहेत. त्यांची चोरी चोरट्यांकडून होत असल्याने भाजी, फळे विक्रेत्यांचे नुकसानही होत आहे.

आणखी समस्या काय ?
- मंडईमध्ये भाजी विक्रेते बसत नसल्याने गाळ्यांची दुरवस्था
- काही विक्रेत्यांनी इतर वस्तू ठेवल्याने मोकळ्या गाळ्यांचे विद्रूपीकरण
- स्वच्छतागृहात पाण्याच्या अभावाने दुर्गंधी
- गाळ्यांमध्ये जागोजागी गुटख्याच्या पिचकाऱ्या
- बेशिस्त पार्किंगमुळे रहदारीस अडथळा

महापालिकेचे नुकसान
भाजी विक्रेते भाजी मंडईतील गाळ्यांत बसत नाहीत. महापालिकेला त्यांच्याद्वारे गाळ्यांचे भाडे दिले जात नाही. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.

इंद्रायणीनगरातील भाजी मंडईला लवकरच भेट दिली जाईल. भाजी आणि फळे विक्रेत्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. भाजी मंडईमध्ये बसण्याच्या त्यांना सूचना देण्यात येतील. त्यानंतरही मंडईत न बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे भाजी मंडईतील इतर समस्या ही दूर केल्या जातील.
- अजिंक्य येळे, क्षेत्रीय अधिकारी, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महापालिका

इंद्रायणीनगरातील भाजी मंडईमध्ये भाजी विक्रेते जर वाहनतळावर अनधिकृतपणे अतिक्रमण करून बसत असतील; तर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
- सीताराम बहुरे, उपआयुक्त, भूमी जिंदगी विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका

भाजी मंडईतील गाळे लहान आहेत. त्याचप्रमाणे मंडईची रचना योग्य नसल्याकारणाने ग्राहकांना गाळे सहज दिसत नाहीत. मंडईची सुरक्षा व्यवस्था वाढवली पाहिजे.
- एक भाजी विक्रेता, इंद्रायणीनगर, भोसरी

काय केले पाहिजे ?
- भाजी, फळे विक्रेत्यांना विश्वासात घेऊन मंडईची दुरुस्ती करणे
- रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करणे
- चोरटे, जुगारी, तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविणे
- सौर उर्जेवर सुरू असणारे दिवे पहाटेपर्यंत सुरू ठेवणे
- भाजी विक्रेत्यांना पाणी व इतर सुविधा पुरवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com