
सकाळ इम्पॅक्ट
भोसरी, ता. १२ ः पावसाळा संपल्याने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे पुणे - नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची डांबरीकरणाद्वारे दुरुस्तीस अखेर सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे, वाहनचालकांची खड्डेमय रस्त्यांपासून सुटका होणार आहे. त्याचप्रमाणे यापुढे रस्त्यावरील खड्डे वेळोवेळी भरले जावेत, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.
भोसरीतील पुणे - नाशिक महामार्गावर एमआयडीसी चौक, लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वार चौक, संत तुकाराम बॅंक्वेट हॉल, आदिनाथनगर, पांजरपोळ, लांडगेनगर, स्पाइन रस्त्यावरील राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या विषयी ‘सकाळ’ नेही वेळोवेळी लक्ष वेधले. पावसाळ्यात या रस्त्यांवरील खड्डे मुरुम-मातीने भरले जात होते. त्यामुळे काही दिवसांतच हे खड्डे पुन्हा उघडे पडून रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत होते.
पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून भोसरी, दिघी, मोशी, आळंदी, चाकण आदी भागांकडे ये-जा करण्यासाठी पुणे - नाशिक महामार्ग महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे पुणे - नाशिककडे ये-जा करण्यासाठीही या महामार्गाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. त्यामुळे या महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी असते. त्यातच या महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक झाला होता. त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्यांच्या डांबरीकरणाची मागणी वाहन चालकांद्वारे वारंवार होत होती.
साइडपट्टयाही भरण्यास सुरू
पुणे - नाशिक महामार्गाच्या साइडपट्ट्या न भरल्यामुळे रस्त्याच्याकडेला अर्धा ते एक फुटापर्यंतचे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या विषयी ‘सकाळ’नेही वेळोवेळी आवाज उठवला होता. आता या रस्त्यावरील साइडपट्ट्याही भरण्यात येत आहेत.
पथदिवेही सुरू करा
पुणे - नाशिक महामार्गावर कासारवाडीतील नाशिक फाटा ते ऐतिहासिक प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्यावरील निम्म्या खांबावरील विद्युत पथदिवे बंद आहेत. त्यामुळे वाहन चालकांना रात्रीचा प्रवास करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, हे पथदिवेही सुरू करण्याची मागणी वाहन चालकांमधून होत आहे.
पुणे - नाशिक महामार्गावरील रस्त्यावरील खड्ड्यांची डांबरीकरणाद्वारे दुरुस्ती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावरील वर्दळीच्या चौकात डावीकडे जाणारी वाहने विनाथांबा पुढे जाण्यासाठी नियोजनही करण्यात येत आहे.
- दिलीप शिंदे, उपकार्यकारी अभियंता, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे
पुणे - नाशिक महामार्गावर वाहने भरधाव असतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अचानक ब्रेक लावावा लागत असल्याने वाहन चालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. आता या रस्त्याचे डांबरीकरण होत असल्याने ही समस्या दूर होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याची वेळोवेळी पाहणी करून खड्डे तातडीने बुजविण्यासाठी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.
- सुरेश सवाणे, वाहनचालक