बुद्ध विहारामध्ये धम्म उपासनेबरोबरच ज्ञानसाधना

बुद्ध विहारामध्ये धम्म उपासनेबरोबरच ज्ञानसाधना

Published on

भोसरी, ता. १५ ः बुद्ध विहार ही बौद्ध बांधवांचे आध्यात्मिक स्थान म्हणून परिचित आहेत. मात्र, ज्ञानाची केंद्रे म्हणूनही त्यांची आता ओळख होऊ लागली आहे. या विहारांमधून अभ्यासिकांपाठोपाठ स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू झाली आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकाऱ्यांची व्याख्यानेही आयोजित केली जात आहेत. त्याने विद्यार्थ्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न साकार होत आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र देत त्याशिवाय तरणोपाय नसल्याचे अधोरेखित केले. या त्यांच्या शिकवणीला अनुसरून शाहूनगरमधील धम्मचक्र बुद्धविहारात नालंदा स्पर्धा परीक्षा केंद्रात दीडशे विद्यार्थी आणि नव्वद विद्यार्थिनींना अभ्यासासाठी सोय करण्यात आली आहे. येथे दोन हजार अवांतर पुस्तकांसह दीडशे पुस्तके स्पर्धा परीक्षांसाठी ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासासाठी विनामूल्य ‘वायफाय’ची सेवाही देण्यात आली आहे.
दापोडीतील त्रैलोक्य बौद्ध सहायक गण आणि ‘बार्टी’द्वारे २०१२ मध्ये बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले. २०२२ पर्यंत ‘बार्टी’ने येथील केंद्राला साहाय्य केले. या परीक्षा केंद्रातून शेकडो विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन घेत शासकीय सेवेत अधिकारी बनण्याचे स्वप्न साकार केले.
गेल्या वर्षी निगडीतील यमुनानगरमध्ये धम्मदीप बुद्धविहार आणि बाणाई संस्थेद्वारे सुरू केलेल्या तक्षशीला ग्रंथालय व अभ्यासिका स्पर्धा परीक्षा केंद्रात ५० विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सोय करण्यात आली आहे. येथील ग्रंथालयात विविध स्पर्धा परीक्षेसाठी आठशे पुस्तकांचा संग्रह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.
यावर्षी दिघी गावातील कपिलवस्तू बुद्धविहारात ३१ विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू झाली आहे. येथे ‘वायफाय’ची सेवाही मोफत देण्यात आली आहे. दिघीतील कै. रामभाऊ गबाजी गवळी उद्यानासमोरील विक्रमशीला प्रबोधिनीमध्येही स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

बुद्धविहाराचे नाव स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी संख्या

त्रैलोक्य बौद्ध सहायक गण आणि बार्टी, दापोडी २४०

धम्मचक्र बुद्धविहार, शाहूनगर ७२

तक्षशिला ग्रंथालय व अभ्यासिका, निगडी १

विक्रमशीला प्रबोधिनी, दिघी १

एकूण ३१४

मी लहान असतानाच वडिलांचा मृत्यू झाल्याने असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. धमचक्र बुद्धविहार संचलित नालंदा स्पर्धा परीक्षा केंद्र व्यवस्थापनाने विनामूल्य प्रवेश देऊन अभ्यासास पोषक वातावरण दिले. सोबतच विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांनी विद्यार्थ्यांचे मनोबल देखील वाढविले. त्यामुळे मी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकलो.
- नागेश बामणे, कक्ष अधिकारी मंत्रालय, (निवड : सहायक राज्यकर आयुक्त)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com