वाहतूक कोंडीचा रुग्णांच्या जिविताला धोका कायम
भोसरी, ता.२१ : राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील पुणे - नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूंकडील सेवा रस्त्यांवर वाहनांची कोंडी नित्याचीच झाली आहे. एका चौकातील कोंडीचा परिणाम इतर चार ते पाच चौकांत झाल्याचे दिसून येत आहे. महामार्गाच्या परिसरात रुग्णालये आहेत. त्यामुळे, रस्त्यावरील वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून रुग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होत आहे.
भोसरीतील पुणे - नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर आदिनाथनगर ते धावडेवस्तीपर्यंतचा रस्ता आणि नाशिक - पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्यावर रोशल गार्डन ते चांदणी चौकादरम्यान ही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळते. या रस्त्यावर चांदणी चौक, संविधान चौक, पीएमटी चौक, भोसरी-आळंदी रस्ता चौक, बीआरटीएस चौक, कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह आदी चौक अगदी शंभर-दोनशे मीटर अंतरावर येतात. त्यामुळे एका चौकात झालेल्या वाहतूक कोंडीचा परिणाम हा इतर चौकांतही झालेला दिसून येतो.
भोसरीतील चांदणी चौकात लांडेवाडीकडून येणारी वाहने मोशी, आळंदी रस्ता व दिघी रस्त्याकडे वळतात. त्याचप्रमाणे लांडेवाडी चौक मार्गे निगडी, चिंचवड आदी भागांकडे जाणारी वाहनेही या चौकातून जातात. त्यामुळे या चौकात वाहनांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते. इथे ट्रॅफिक वॉर्डन किंवा वाहतूक पोलिस असतात. मात्र, अरुंद रस्ता आणि चक्रपाणी वसाहतीकडे जाणाऱ्या चौकातील पीएमपी बसचा थांब्यामुळेही वाहनांची कोंडी होते. संविधान चौकात दिघी रस्त्याने येणारी वाहने मोशी, पुणे, लांडेवाडी आदी मार्गाने पुढे जातात. प्रत्येक चौकात वाहन चालक बेशिस्तपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे, चौकात एक जरी वाहन थांबले तरी त्याचे वाहनांच्या कोंडीत रूपांतर होते.
रुग्णांनाही फटका
भोसरीतील बैलगाडा शर्यत घाटाजवळ महापालिकेचे शंभर खाटांचे नवीन रुग्णालय आहे. कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील रस्त्यावरून या रुग्णालयाकडे जाता येते. त्याचप्रमाणे या रस्त्यावर अन्यही खासगी रुग्णालये आहेत. त्यामुळे, वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकून रुग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होत आहे.
प्रमुख कारणे
- महामार्गाच्या सेवा रस्त्यांवर हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण
- सेवा रस्त्यांवर ‘नो पार्किंग झोन’ मात्र, दुतर्फा वाहने लावली जातात
- अर्बन सिटी अंतर्गत झालेल्या कामांमुळे सेवा रस्त्याची रुंदी कमी
- चौकामधून बेशिस्तपणे जाणारी वाहने
काय करता येईल ?
- सेवा रस्ते हातगाडी आणि पथारीमुक्त करणे
- सेवा रस्त्यांवरील दोन्ही बाजूंकडे ‘नो पार्किंग झोन’ची काटेकोरपणे अंमलबजावणी
- संध्याकाळच्यावेळेस खासगी प्रवासी बसना रस्त्यावर थांबण्यास मज्जाव
- चौकातील वाहतूक पोलिस, ट्रॅफिक वॉर्डनच्या संख्येत वाढ
गेले तीन दिवस पुणे - नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर खासगी प्रवासी बसची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होती. त्याचा परिणाम वाहतूक कोंडीवर झाला. या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी भोसरी वाहतूक पोलिसांद्वारे दररोज योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. या रस्त्यावर महापालिकेचीही विकासकामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
- दीपक साळुंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भोसरी पोलिस वाहतूक विभाग
भोसरीतील पुणे - नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील अतिक्रमण केलेले हातगाडीवाले, पथारीवाले यांच्यासह विविध वस्तू विक्रेत्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे दररोज कारवाई सुरू आहे. रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेद्वारे योग्य ती कारवाई केली जाईल.
- तानाजी नरळे, ‘इ’ क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. संध्याकाळच्या वेळेस या सेवा रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे मनस्ताप होतो. वेळेचाही अपव्यय सहन करावा लागतो.
- शैलेंद्र रासकर, वाहन चालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.