भोसरी ग्रामस्थांद्वारे ‘एक गाव, एक शिवजयंती’ उत्सव
भोसरी, ता. १७ : भोसरी ग्रामस्थांसह गावातील तालीम मंडळ, सामाजिक संघटना, क्रीडा संघटना अशा पंधरा संस्था-संघटनांनी एकत्र येत ‘एक गाव, एक शिवजयंती’ साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना ढोल पथकांद्वारे वाद्य वादनामधून मानवंदना देण्यात येणार आहे.
भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या पुढाकाराने तिसऱ्या वर्षी ‘एक गाव, एक शिवजयंती’ साजरी करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत बुधवारी (ता. १८) रात्री आठ वाजता गुरुनाद, जगदंब, निनाद, शिवनिती, गजराज, नादगंधर्व, वीर, स्वराज आदी आठ ढोल-लेझीम पथकांद्वारे राजमाता उड्डाणपुलाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. १९) शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे आयोजन फुगे-माने तालीम, लांडगे लिंबाची तालीम, गडकोट सेवेकरी, पठारे-लांडगे तालीम, कृपाताई फाउंडेशन ट्रस्ट, हिंदवी स्वराज्य ग्रुप, युवा प्रतिष्ठान, समस्त गव्हाणे तालीम, मधले फुगे तालीम, लोंढे तालीम, भवानी तालीम, छावा प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव, श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सव, भैरवनाथ कबड्डी संघ, भैरवनाथ कबड्डी संस्था तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक समिती व भोसरी ग्रामस्थांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
लांडेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवमहाराष्ट्र तरुण मंडळाद्वारे शुक्रवारी (ता. १९) सकाळी दहा वाजल्यापासून मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात नागरिकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचेही आयोजन सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आले आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज तरुण मित्र मंडळाने भोसरी गावठाणातील विठ्ठल मंदिराजवळ विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

