मुंबई-पुणे महामार्गलगत स्मार्ट सिटीची काम अर्धवट
चिंचवड स्टेशन, ता. २० ः मुंबई-पुणे महामार्गालगत पिंपरी ते निगडीमधील स्मार्ट सिटीची कामे मुदत संपूनही काम झाली नसल्याने नागरिक नाराज आहेत. जागोजागी मोठमोठे पाइप, उखडलेले पेव्हिंग ब्लॉक, तुटलेले दिवे दिसतात. इतका पैसा खर्च करूनही काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. कोट्यवधी रुपये खर्चाचा प्रकल्प दोन वर्षानंतरही पूर्ण झाला नसल्याने कोंडी, पदपथांवरील अतिक्रमणे, पादचारी, सायकलस्वारांचा जीव मुठीत अशी स्थिती आहे.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते निगडी येथील भक्तीशक्ती चौकापर्यंतचा रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्याचे नियोनज महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी केले. सुमारे ६० कोटी रुपयांची निविदा रक्कम असलेल्या या कामात सायकल ट्रॅक, पदपथ आणि सुशोभीकरण अशी तीन कामांचा एकत्रित मंजूर करण्यात आला. आतापर्यंत यावर १५ कोटी रुपये खर्च झाला आहे. १५ मार्च २०२४ रोजी हे काम ठेकेदारास देण्यात आले. पुढील महिन्यात मुदत संपणार असली तरी प्रकल्प दृष्टिपथात नाही.
आंबेडकर चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मोरवाडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकापर्यंतच्या काम झाले आहे. तेथे अनेक नागरिकांनी चार चाकी वाहने उभी केली हेत. चौकाजवळील परिसरात थोडे काम बाकी आहे. मोरवाडी चौक ते एम्पायर इस्टेटच्या पुलापर्यंतच्या कामात अनेक ठिकाणी वाळूचे ढिगारे, अतिक्रमणे, उखडलेले पेव्हिंग ब्लॉक पडून आहेत. सेंट्रल पार्क पासून आनंदनगरपर्यंत काम पूर्ण आहे, मात्र तेथील मॉलच्या बाहेर खाद्यपदार्थांच्या अनेक टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. तेथे ग्राहकांसाठी टेबल-खुर्च्याही ठेवण्यात आल्या आहेत. तेथून पुढे महावीर चौकापर्यंत असलेल्या आनंदनगरमधील काम अद्याप सुरू झालेले नाही. महावीर चौकापासून पुढे जयश्री चित्रपटगृहापर्यंत मेट्रो स्थानकाचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथेही या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. तेथून अग्रेसन भवनपर्यंत काही जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे काम सुरू नसल्याचे महापालिका अधिकारी सांगतात. आकुर्डी खंडोबा माळ ते निगडीपर्यंत अर्धवट काम झाले आहे, तर काही ठिकाणी काम सुरू आहे. काही ठिकाणी काम सुरूच झालेले नाही.
---
पादचारी आणि सायकलस्वार या दोघांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रकल्प उभारण्यात आला. महामार्गावरील भरधाव वाहनांमुळे त्यांना धोका निर्माण होऊ नये उद्देश आहे. आनंदनगर येथीस काम एस.आर.ए. योजनेमुळे सुरू झालेले नाही. मेट्रो स्थानकाच्या कामामुळे महावीर चौकापासून अग्रेसन भवनपर्यंत काम अद्याप सुरू झालेले नाही, मात्र ते लवकरच करण्यात येणार आहे.
- बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, शहरी दळणवळण विभाग, महापालिका
नगररचना विभागाने आताच आमच्या विभागाकडे मोजणीचा तपशील दिला आहे. त्यानुसार जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली आहे. लवकरच काम पूर्ण होईल. पदपथावर लावलेले दिवे चोरीला गेले आहेत. त्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. कंत्राटदाराने एका वर्षाची मुदतवाढ मिळावी, असे पत्र दिले आहे. सल्लागारांचा अभिप्राय आल्यानंतर मुदतवाढीवर विचार केला जाईल.
- राहुल पाटील, उपअभियंता, शहरी दळणवळण विभाग, महापालिका
दुकानात येणाऱ्या ग्राहकांना चार चाकी वाहन लावण्यात अडचण येते. पूर्वी रस्ता मोठा होता. एकीकडून बीआरटी मार्गीका तर एकीकडून सुशोभीकरणाच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. दुकानासाठी माल आणल्यानंतर तो उतरवितानाही अडचणी येतात.
- मंगेश कांबळे, व्यापारी
पदपथावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दुचाकी रस्त्यावर लावून कोणत्याही दुकानात जाता येत नाही. खूप त्रास सहन करावा लागत आहे.
- राजेंद्र मोरे, ज्येष्ठ नागरिक
---
दृष्टिक्षेपात
- पुढील महिन्यात दोन वर्षांची मुदत संपत असूनही काम अपूर्ण
- कंत्राटदाराचे एका वर्षाची मुदत वाढविण्यासाठी पत्र
- सुमारे ६० कोटी पैकी १५ कोटी रुपये खर्च
- मेट्रो स्थानकाच्या कामामुळे परिणाम
- एका बाजूला बीआरटी मार्गीका, दुसरीकडे अर्बन स्ट्रीटमुळे रस्ता अरुंद
- व्यापारी, पादचारी, सायकलस्वारांच्या समस्या कायम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

