

चिंचवड, ता. ९ ः येथील उद्योगनगर उद्यानामध्ये सर्वत्र राडारोडा, कचरा आणि झाडांच्या फांद्या कित्येक दिवसांपासून पडलेल्या दिसून येत आहेत. वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उद्योगनगरमधील उद्यानात ज्येष्ठ नागरिकांसह महिला, पुरुष दररोज सकाळ आणि संध्याकाळ फेरफटका मारत असतात.
उद्यानातील बहुतांश भागांत कापलेल्या व गळून पडलेल्या झाडांच्या फांद्या, पानांचे ढीग साचले आहेत. त्यामुळे उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश भागांतही स्वच्छतेचा अभाव असून कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव पसरण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे. याशिवाय उद्यानातील स्वच्छतागृहाची स्थितीही अत्यंत बिकट आहे. कर्मचाऱ्यांकडून नियमित साफसफाई न झाल्यामुळे स्वच्छतागृह वापरण्यासाठी अयोग्य बनले आहे. तसेच दुर्गंधी देखील पसरली आहे. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.
त्यामुळे उद्यानाची तातडीने आणि दररोज स्वच्छता केली जावी तसेच उद्यान सुशोभित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी लाखो रुपये खर्च करून सुविधा उभारण्यात आल्या. तसेच त्याच्या देखभालीसाठी देखील लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, सध्या या सुविधा पूर्णतः अडगळीत गेल्या आहेत. झाडांची अव्यवस्थित छाटणी, पालापाचोळा, कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छतेमुळे उद्यानात फेरफटका मारणे अशक्य झाले आहे.
- संजय घोरपडे, स्थानिक नागरिक
उद्यान सहाय्यक यांना आम्ही कळविलेले आहे. त्याप्रमाणे बऱ्यापैकी तेथील स्वच्छता झालेली आहे. झाडांच्या फांद्या वगैरे सर्व बाहेर काढलेल्या आहेत. अजूनही काही प्रमाणात पालापाचोळा वगैरे असेल; तर तो देखील साफ केला जाईल.
- सुनील दुदुस्कर, पर्यवेक्षक, उद्यान विभाग, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.