दळवीनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्कला विजेचा ‘झटका’

दळवीनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्कला विजेचा ‘झटका’
Published on

चिंचवड, ता. १२ ः दळवीनगर, इंदिरानगर आणि प्रेमलोक पार्क परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या भागांतील नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. बहुतेक सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासातही व्यत्यय येत आहे. या शिवाय ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या आयटीयन्सलाही मोठा ‘झटका’ सहन करावा लागत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून दळवीनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्क परिसरातील नागरिकांना वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा अनुभव येत आहे. महावितरणच्या बिजलीनगर विभागाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. केवळ तांत्रिक दोष नव्हे; तर देखभालीच्या अभावामुळेही ही समस्या उद्‍भवत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
चिंचवडमधील अनिल देवगांवकर म्हणाले,‘‘मार्च महिन्यात चिंचवड परिसरामध्ये सध्या सारखीच वीज जात आहे. छुप्या पद्धतीने भारनियमन चालू केले आहे की काय ? अशी शंका आम्हा रहिवाशांना वाटत आहे. बहुतेक सोसायटीमधील पाण्याच्या मोटर स्वयंचलित मोडवर चालतात. पाणी संपले तरीही वीज गेली असल्याने पाणीवर टाकीत चढविणे शक्य होत नाही. गृहिणींचे पाण्याअभावी हाल होत आहेत.’’
विद्यार्थिनी प्रेरणा निंबाळकर म्हणाली,‘‘सध्या आमच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. अशा वेळी वारंवार वीज खंडित झाल्याने आम्हा विद्यार्थ्यांचा अभ्यास खोळंबत आहे. रात्री अभ्यास करत असताना अचानक दोन तास वीज गेल्याने परीक्षेच्या तयारीवर गंभीर परिणाम होत आहे.’’
प्रेमलोक पार्क येथील आयटी अभियंता संतोष जाधव म्हणाले,‘‘वारंवार वीज खंडित झाल्याने आम्हाला सर्वात मोठा फटका बसत आहे. वर्क फ्रॉम होमसाठी लॅपटॉप सतत चार्ज करावा लागतो. मात्र इथे दोन - दोन तास वीज गायब असताना काम कसे होणार ? आमच्या ऑनलाइन बैठका, क्लायंट प्रोजेक्टमध्ये अडचणी येत आहेत. काही कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून वेळेत काम पूर्ण न केल्याने ओरडा देखील बसतो.’’


कार्यक्षमता कधी दाखविणार ?
एरवी एक किंवा दोन महिन्यांचे वीज बिल थकले की वीज जोड तोडण्याची तत्परता दाखवणारी महावितरण कंपनी त्यांच्या स्वतःच्या कार्यक्षमतेत तत्परता कधी दाखवणार ? असा संतप्त सवाल चिंचवडमधील सामान्य नागरिक विचारत आहेत.


विद्युत वाहिनीच्या तांत्रिक बिघाडामुळे हा पुरवठा खंडित झाला आहे. वायर जळाल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, दुरुस्तीचे काम सुरू असून एका तासाच्या आत वीजपुरवठा सुरळीत होईल.
- दिवाकर देशमुख, कार्यकारी अभियंता, बिजलीनगर विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com