पावसाने मेंढपाळांच्या हालअपेष्टांत आणखी भर

पावसाने मेंढपाळांच्या हालअपेष्टांत आणखी भर

Published on

मच्छिंद्र कदम ः सकाळ वृत्तसेवा
चिंचवड, ता.२७ ः नेहमी चाऱ्याच्या शोधात कित्येक मैल भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना यंदाच्या पावसामुळे प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत असून मेंढ्यांना चारण्यासाठीही त्यांना बाहेर पडणे अवघड झाले आहे. सततच्या पावसाने राहण्याची झोपडी देखील ओलसर व पाण्याखाली येत आहे. रात्रीच्या वेळेस अक्षरक्षः जागरण करून रात्र काढावी लागत आहे.
यवत (ता.दौंड) येथील मूळ रहिवासी असलेल्या मेंढपाळ कुटुंबाचा सध्याचा मुक्काम दळवीनगर-भोईरनगर शेजारील एमआयडीसीच्या मोकळ्या जागेवर ठेवला आहे. गेल्या तीन-चार पिढ्यांपासून हे कुटुंब शहरात राहात असले तरी आजही त्यांचे जीवन भटकंतीचेच आहे. पावसाळा सुरू होताच हे कुटुंब मोशी, चिखली, चऱ्होली, देहू, आळंदी, चाकण आदी परिसरात मोकळ्या जागेत मेंढ्यांच्या चाऱ्यासाठी स्थलांतर करते. त्या त्या ठिकाणी कधी १५ दिवस राहत असते. मात्र, यावर्षीच्या पावसामुळे त्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मेंढ्यांना चारण्यासाठी बाहेर पडताच येत नाही.

काय आहेत अडचणी ?
- सततच्या पावसामुळे राहण्याची झोपडीदेखील ओलसर व पाण्याखाली
- कपडे भिजतात, जागरण करून रात्र काढावी लागते
- लहान मुले उपाशी झोपतात; तर जनावरे थरथरत आजारी पडतात
- पावसात चारा मिळतो; मात्र त्या बदल्यात नुकसान अधिकच सहन करावे लागते
- जनावरांच्या औषधोपचाराचा खर्च वाढतो, जीवनावश्यक वस्तू मिळवणे कठीण होते

शहरीकरणाचा फटका
शहरातील मोकळ्या जागा हळूहळू संपत चालल्या आहेत. काही भागांत तर रहिवासी तक्रारी करतात की, मेंढ्यांच्या ‘वास येतो’, तर काही वेळा स्थानिक लोक आणि पोलिस त्रास देतात. ‘शहरात जनावरं पाळण्याचा अधिकार नाही,परवाना दाखवा’ ? अशा शब्दांत त्यांच्यावर दबाव आणला जातो. परिणामी, शिक्षण व सुविधा नसलेल्या या धनगर समाजावर दुहेरी संकट कोसळत चालले आहे.


आमच्या चार पिढ्यांपासून थेरगाव, वाकड, कस्पटे वस्ती, रावेत, पुनावळे आदी भागांत राहातो. परंतु शहरीकरणामुळे मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या. त्यामुळे आम्हाला मेंढपाळांना जागा कमी पडू लागली आहे. अधून मधून ज्यांच्याकडे जमीन आहे ते आम्हाला मेंढ्या चारण्यासाठी मोकळ्या शेतात बोलावून घेत असतात. परंतु शहरीकरणाबरोबर जुनी लोक देखील राहिली नाहीत. त्यामुळे आमची अडचण झाली आहे. आम्हाला तसेच आमच्यासारख्या मेंढपाळांना देखील महापालिकेने किंवा शासनाने औषधोपचार तसेच काही आर्थिक भरीव मदत करावी जेणेकरून आमच्या अडचणी सुटू शकतील.’’
- दत्तात्रेय खरात, मेंढपाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com