सतत कामे चालू; तरीही सावरकर उद्यानाची दुर्दशा
चिंचवड, ता.३० ः प्रेमलोक पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानात सातत्याने कामे चालू असूनही त्याची दुर्दशा झाली आहे. लहान मुलांसाठी साधारणतः १६ वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या झुकझुकगाडीचे तीनही डबे आता गायब झाले आहेत. रेल्वे इंजिन व लोहमार्ग गंजलेल्या अवस्थेत आहेत. तुटलेले झोपाळे वर टांगून ठेवलेले आहेत. त्यामुळे, परिसरातील बालगोपाळांसह नागरिकांत नाराजीची भावना आहे.
सध्या पावसाळा सुरू असताना देखील सावरकर उद्यानातील कामे संथगतीने सुरू आहेत. अनेक अपूर्ण कामे नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत आहेत. साधारणतः १६ वर्षांपूर्वी उद्यानात बालगोपाळांसाठी झुकझुक गाडी कार्यरत होती. तिच्या तीन डब्यांमध्ये एकावेळी १२ ते १५ मुले बसून उद्यानाचा फेरफटका मारत असत. मात्र, तिचे तीनही डबे आता गायब झाले आहेत. तसेच मुलांची खेळणी आणि झोपाळे तुटलेले आहेत. तुटके झोपाळे वरती टांगून ठेवलेले आहेत.
काय आहेत समस्या ?
- जॉगिंग ट्रॅक (पायवाट) उखडलेली, ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास
- गेल्या दीड वर्षांपासून उद्यानात ठिकठिकाणी झाडांच्या झावळ्यांचे ढीग
- त्याने जॉगिंग ट्रॅकवर सर्प वगैरे येतील की काय ? याची नागरिकांमध्ये भीती
- ओपन जिमसाठीचे साहित्य घाईगडबडीत बसविले, पाया कमकुवत, ओबडधोबड
- पुरुष स्वच्छतागृहातील युरिन पॉटचे पाइप, वॉश बेसिनचे पाइप व फ्लश बॉक्स तुटलेले
- पोलिस कर्मचाऱ्यांकडून दिवसभर वापर, मात्र नियमित स्वच्छतेचा अभाव
- टाकाऊ पाणी प्रक्रिया प्रकल्प (डब्ल्यूटीपी) बंद, पिण्याचा पाण्याचा वापर
गेल्या चार वर्षांचे उद्यानाच्या कामाचे लेखापरिक्षण (ऑडिट) झाले पाहिजे. कारण, एकदा पेव्हिंग ब्लॉक बसविल्यानंतर त्याच ब्लॉकवर सिमेंटचा कोबा करण्यात आला आणि आता सध्या ते सर्व उखडले आहे. ठेकेदार नीट पद्धतीने काम करत नाही. अशा प्रकारे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे.
- संदीप शिंदे, स्थानिक रहिवासी, चिंचवड
झाडांच्या झावळ्यांसाठी जागा कुठेही उपलब्ध नसल्यामुळे त्या बऱ्याच दिवसांपासून तिथे आहेत. जॉगिंग ट्रॅक उखडलेले आहेत अथवा नाही त्याची कल्पना नाही. ओपन जिमचे काम हे सर्वच ठिकाणी आमदार निधीतून झालेले आहे. जवळच पोलिस आयुक्तालय असल्यामुळे स्वच्छतागृहाचा वापर सर्रास पोलिसांकडून केला जात आहे. उद्यान वेळेत बंद केले तरी देखील पोलिस तेथील कर्मचाऱ्याला परत उघडायला सांगतात. स्वच्छतागृहातील बाकीचे नळ, वाहिन्या वगैरे तुटल्या असतील; तर ती सर्व कामे केली जातील.
- ज्ञानोबा कांबळे, सहाय्यक उद्यान निरीक्षक, उद्यान विभाग, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
CWD25A01450, CWD25A01451
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.