चिंचवडमध्ये भजन स्पर्धेत 
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

चिंचवडमध्ये भजन स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

Published on

चिंचवड, ता. १ ः कै. सोपानराव भोईर यांच्या २० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इंदिरानगर येथील शिवलिंग मंदिरात आयोजित महिला भजनी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुवारी पार पडलेल्या या सोहळ्यात श्रद्धा, भक्ती आणि सांस्कृतिक एकतेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
या स्पर्धेत एकूण ४७ महिला भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत आकुर्डी येथील राधाकृष्ण महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. शिवशक्ती महिला भजनी मंडळ, संत तुकाराम नगर यांना द्वितीय तर संतोषी माता महिला भजनी मंडळ, चिंचवड यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
यावेळी पसायदान महिला भजनी मंडळ, दळवीनगर; सावतामाळी भजनी मंडळ, कृष्णानगर; वाल्हेश्वर महिला भजनी मंडळ, वाल्हेकरवाडी; आणि दुर्गादेवी महिला भजनी मंडळ, पिंपळे गुरव यांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. वैयक्तिक कामगिरीबाबत वैभव रायकर यांना उत्कृष्ट तबला वादनासाठी, शरयू कुलकर्णी यांना हार्मोनिअम वादनासाठी तर मोनिका नखाते यांना मृदुंग वादनासाठी गौरविण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण मधुकर महाराज मोरे व सुरेखा कामठे यांनी केले. नीलम शिंदे यांनी संयोजन केले. बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी आयोजकांनी कै. सोपानराव भोईर यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून दिली. यावेळी भाऊसाहेब भोईर, दत्तात्रय साकोरे, अशोक काळभोर, विलास शिरवले यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.

Marathi News Esakal
www.esakal.com