आकुर्डीत पैशांअभावी बेवारस रुग्णाची अडवणूक

आकुर्डीत पैशांअभावी बेवारस रुग्णाची अडवणूक

Published on

चिंचवड, ता.११ ः आकुर्डीतील महापालिकेच्या कै.प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालयात पैशांअभावी बेवारस रुग्णाची वैद्यकीय तपासणी रोखण्यात आली. तसेच रुग्णालयामधून डिस्चार्ज देताना अतिदक्षता विभागाच्या (आयसीयू) शुल्काचीही मागणी करण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. अखेर एका सामाजिक संस्थेच्या पाठपुराव्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्याचे बिल माफ केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वारा, वाल्हेकरवाडी परिसरात रस्त्यावर एक बेवारस व्यक्ती चक्कर येऊन पडला. त्याला
नानक साई सेवा ट्रस्टचे अध्यक्ष कमलजीत सिंह मेहता यांनी तत्काळ रावेत येथील महापालिकेच्या दवाखान्यात दाखल केले. प्राथमिक तपासणीत रक्तदाब २३० पेक्षा अधिक आढळून ‘ब्रेन स्ट्रोक’ची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. स्थिती गंभीर असल्याने रुग्णाला पुढील उपचारासाठी आकुर्डी येथील प्रभाकर कुटे स्मृती रुग्णालयात हलविण्यात आले.
डॉक्टरांनी तातडीने उपचार करून रुग्णाचा जीव वाचवला; मात्र, टुडी इको तपासणीसाठी ११०० रुपयांची मागणी केली. रुग्ण बेवारस असल्याचे सांगूनही तपासणी रोखण्यात आली. तसेच डिस्चार्जवेळी आयसीयू शुल्काचीही मागणी केली गेली.

रुग्णालयातील डॉक्टरांनी चांगले उपचार दिले. त्या माणसाचा जीव वाचवला. पण, रुग्णालय प्रशासनाने असंवेदनशील वागणूक देऊन टूडी इकोसह इतर तपासणीसाठी ११०० रुपये आणि आयसीयू शुल्काची मागणी केली. रुग्ण बेवारस असल्याचे नमूद केल्यानंतरही उलट मला अशा रुग्णांना थेट ससून रुग्णालयात घेऊन जाण्याची समज दिली. महापालिकेची रुग्णालये बेवारस व गरीब लोकांसाठी नाहीत का ? असा प्रश्न उपस्थित होतो.
- कमलजीतसिंह मेहता, अध्यक्ष, नानक साई सेवा ट्रस्ट

संबंधित रुग्णाचे बिल रुग्णालयाने पूर्ण माफ केले आहे. मात्र, टुडी इकोसाठी खासगी एजन्सीकडून तपासणी होत असल्याने त्याचे शुल्क वेगळे आकारले जाते. आम्हाला देखील बिल माफीसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. त्याची पूर्तता केली की, मग बिल माफ होत असते. संबंधित व्यक्तीचे बिल पूर्णपणे माफ केलेले आहे.
- बाळासाहेब होडगर, वैद्यकीय अधिकारी, आकुर्डी रुग्णालय


CWD25A02222

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com