स्वच्छ शहराचे नगारे, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे
चिंचवड, ता. २८ : ‘स्वच्छ सर्वेक्षण’ उपक्रमात मानाचे स्थान पटकावलेल्या पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. त्यामुळे महापालिकेला आता सुस्ती आली आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. चिंचवड ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढिगारे प्रशासनाच्या दुर्लक्षाची साक्ष देत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
चिंचवड परिसरातील प्रेमलोक पार्क, इंदिरानगर, पवनानगर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, चापेकर चौक, तुळजाभवानी चौक, एसकेएफ कंपनी रस्ता अशा अनेक भागांमध्ये कचरा साचून आहे. कचरा उचलणारी गाडी आठवड्यातून एकदाच येते. कधी-कधी पंधरा दिवसही येत नाही,अशी नागरिकांची तक्रार आहे. परिणामी परिसरात समस्या वाढल्या आहेत. महापालिकेमध्ये आरोग्य निरीक्षक, आरोग्य सहायक आणि मुकादम आणि त्यांच्या वरिष्ठांचे या स्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ही स्थिती पाहता, ‘‘स्वच्छ सर्वेक्षणानंतर महापालिकेने शहर स्वच्छतेतील लक्षच काढून घेतले आहे,’’ असे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्त्याकडेला तुटलेल्या काच, बल्ब, ट्युबलाइटचे अवशेष, इमारत बांधकामाचे टाकाऊ साहित्य, पावसाळी वाहिनीतील टाकलेला कचरा हे साहित्य प्रामुख्याने या कचऱ्यात दिसून येते.
पर्यावरण विभागाकडे दिलेल्या लेखी मागणीत नागरिकांनी प्रत्येक कचरा गाडीला ट्यूबलाईटसारखा कचरा टाकण्यासाठी पीव्हीसी पाईपची सोय करावी,अशी मागणी केली होती. मात्र,या प्रस्तावावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे सांगण्यात येत आहे. एकदाच वापरता येणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या आणि अन्य साहित्यावर बंदी असूनही त्याचा वापर सुरूच आहे.काही नागरिक या पिशव्यांत कचरा जमा करतात आणि तोच सार्वजनिक ठिकाणी टाकतात. त्यामुळे प्लॅस्टिक कचरा अधिक वाढत आहे.
कचऱ्याच्या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी, लेखी अर्ज आणि जनसंवाद सभेत मागण्या केल्या. तरीही, तोडगा काढण्याबाबत ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे ‘स्वच्छ सर्वेक्षणातील यश’ केवळ कौतुक करण्यासाठीच आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणात प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर महानगरपालिकेला जणू मरगळ आली आहे. शहरभर रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग, अडथळा ठरणाऱ्या फांद्या आणि रस्ता दुभाजकातील छाटणी केलेल्या झाडांचे अवशेष पडून असतात. त्यावर नागरिक कचरा टाकतात आणि शेवटी ते ठिकाणच कचराकुंडीत बदलते. महानगरपालिका पुन्हा स्वच्छतेचा उत्साह दाखवून शहरातील कचरा व्यवस्थापन प्रभावी करेल, अशी जनतेची अपेक्षा आहे.
- सिकंदर घोडके, स्थानिक नागरिक, चिंचवड
गेल्या काही महिन्यांपासून चिंचवडसह परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव जाणवतो आहे. रस्त्याच्या कडेला आणि गल्लीबोळात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. यामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढत आहे. स्वच्छतेसाठी महापालिकेने तातडीने ठोस उपाययोजना करून नियमित कचरा संकलन सुरू करावे.
- इंद्रजीत चव्हाण, स्थानिक नागरिक, चिंचवड
आरोग्य विभागाचा पदभार मला नुकताच मिळालेला आहे. ब क्षेत्रीय कार्यालय परिसरातील कचऱ्याच्या समस्येबाबत मी आरोग्य विभागाला माहिती देतो. तसेच सर्व ठिकाणच्या कचऱ्याच्या ढिगांचे संकलन करण्यास सांगतो.
- प्रदीप ठेंगळ, उपायुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

