इंदिरानगर, भोईरनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला
चिंचवड, ता. ३१ ः इंदिरानगर, भोईरनगर, दळवीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक भयभीत झाले आहेत. विशेषतः सकाळच्या वेळी शाळेत जाणाऱ्या मुलांवर आणि त्यांना सोडण्यासाठी आलेल्या महिलांवर कुत्र्यांचे अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक महिलांनी सांगितले की, दररोज सकाळी मुलांना शाळेच्या बसमध्ये बसवायला जात असताना काही कुत्रे अचानक अंगावर धावून येतात. काहीवेळा कुत्रे पाठलाग करतात, त्यामुळे मुलांमध्येही भीती निर्माण झाली आहे.
इंदिरानगर, भोईरनगर आणि दळवीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून, त्यामुळे अपघात आणि जखमी होण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. या समस्येमागे उघड्या कचऱ्याचे ढिगारे, अन्नाचा शोध आणि वाढती लोकसंख्या यामुळे निर्माण झालेली जागेची कमतरता ही प्रमुख कारणे असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच, कुत्र्यांचा समूह तयार झाल्यास ते अधिक आक्रमक होतात. कुत्र्यांचे बंध्याकरण, लसीकरण आणि नियमित पकडमोहीम राबविल्यास हा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. नागरिकांनी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे या संदर्भात तक्रारी दाखल केल्या असून इंदिरानगरसह भोईरनगर आणि दळवीनगर परिसरात विशेष मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
‘‘माझा मुलगा शाळेच्या बसची वाट पाहत रस्त्यावर उभा असताना अचानक तीन कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तत्काळ मदत करून त्याला वाचवले. या प्रकारानंतर महापालिकेने ठोस उपाययोजना करावी.
- तृप्ती माने, रहिवासी, इंदिरानगर
‘‘मी रात्री घरी परतताना दळवीनगर परिसरात कुत्र्यांचा समूह अंगावर धावून येतो. त्यांची संख्या इतकी वाढली आहे की मला रस्ता बदलून दुसऱ्या मार्गाने जावे लागते. पशुवैद्यकीय विभागाने लवकरात लवकर उपाययोजना करावी.’’
- शकील पठाण, रहिवासी, दळवीनगर
‘‘इंदिरानगर, दळवीनगर आणि भोईरनगर परिसरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पिंजऱ्याची गाडी लवकरच पाठवण्यात येईल. त्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन नसबंदी शस्त्रक्रिया आणि लसीकरण करण्यात येईल, ज्यामुळे त्यांच्या संख्येवर नियंत्रण येईल आणि आक्रमक होण्याचे प्रमाण कमी होईल.’’
- अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

