निसर्गाची ‘विषकन्या’ कॉसमॉस वनस्पतीवर नियंत्रण कठीण

निसर्गाची ‘विषकन्या’ कॉसमॉस वनस्पतीवर नियंत्रण कठीण

Published on

चिंचवड, ता.१ ः घोराडेश्वर, श्री क्षेत्र भंडारा डोंगरसह पश्चिम घाटात विदेशी ‘कॉसमॉस’ या तण वजा फुलांचे आक्रमण वाढत असून आकर्षक आणि केशरी फुलांच्या ताटव्यांनी बहरणारी ही वनस्पती प्रत्यक्षात निसर्गाची ‘विषकन्या’ ठरत आहे. तिच्या निर्मूलनासाठी श्रमदान मोहिमा राबवूनही त्यावर नियंत्रण आणणे अत्यंत कठीण झाले आहे.
पश्चिम घाटाच्या परिसरात विदेशी ‘कॉसमॉस’ फुलांचे वाढत्या आक्रमणामुळे संपूर्ण परिसंस्थेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. तिच्या निर्मूलनासाठी गेल्या तीन वर्षांपासून पिंपरी चिंचवड हिंदू खाटिक चॅरिटेबल ट्रस्ट, ईसीए आणि सावरकर मित्र मंडळ या संस्थांच्या स्वयंसेवकांकडून श्रमदान मोहीम राबवली जात आहे. परंतु, ही तण वजा वनस्पती वारा, पाणी आणि वाहनांच्या चाकांमधून प्रचंड प्रमाणात इतरत्र पसरत असल्याने तिच्यावर नियंत्रण आणणे अत्यंत कठीण झाले आहे.

कॉसमॉसचा धोका कसा ?
- पाळीव, जंगली जनावरांना चारा मिळेनासा; दूध, मांस उत्पादनात घट
- शेतपिकांमध्येही मोठ्या प्रमाणात उगवल्यास उत्पादनात घट
- अतिरिक्त खर्चातही वाढ होत असल्याने शेती पडीक ठेवण्याचा प्रकार
- मधमाशांची पोळी, मध देणाऱ्या वनस्पतींवर विपरीत परिणाम
- रसायने फवारणी अशक्य, त्यात इतर उपयुक्त वनस्पतीही नष्ट होण्याचा धोका


कॉसमॉस दिसायला सुंदर असले तरी ते जैवविविधतेच्यादृष्टीने घातक आहे. ना पानाचा उपयोग, ना फुलाचा, ना मुळाचा. उलट तिच्या प्रसारामुळे उपयुक्त गवत आणि वनस्पती नामशेष होत आहेत. प्रत्येकाने निसर्ग रक्षणाचा संकल्प घेऊन पर्यावरणप्रेमींच्या या मोहिमेला हातभार लावावा.
- सिकंदर घोडके, पर्यावरण प्रेमी

मेक्सिकोमधून भारतात शोभेची (ऑर्नमेंटल) म्हणून आलेली कॉसमॉस वनस्पती आता आक्रमणकारी ठरत आहे. वेगाने बीजप्रसार होणारी ही प्रजाती स्थानिक वनस्पतींच्या वाढीस अडथळा निर्माण करते. तिच्या रासायनिक द्रव्यांमुळे इतर वनस्पतींची उगवणक्षमता कमी होत असून प्रकाश, अन्नद्रव्य व जागेसाठी ती मोठी स्पर्धा निर्माण करते. ही वनस्पती फुलपाखरे व किटकांच्या परागीभवन प्रक्रियेवरही विपरीत परिणाम करत आहे. पशुधनासाठी उपलब्ध चारा कमी होत चालला आहे. त्यामुळे या प्रजातीचे तातडीने मुळापासून उच्चाटन करण्याची गरज आहे.
- प्रा. किशोर सस्ते, वनस्पती अभ्यासक, प्रा.रामकृष्ण मोरे महाविद्यालय


CWD25A02385

Marathi News Esakal
www.esakal.com