प्रेमलोक पार्क भागात अद्याप जड वाहनांची रहदारी
चिंचवड, ता. १६ : प्रेमलोक पार्क येथील साई कॅफे चौकात आरएमसी मिक्सर डंपरच्या धडकेत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू होऊन चार दिवस उलटले तरीही अपघातस्थळी वाहतूक सुरक्षिततेबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
आरएमसी मिक्सर डंपर, ट्रक यासारखी अवजड वाहनांची रहदारी अद्याप कायम आहे.
फारुख शकील तांबोळी (वय १५, रा. चिंचवडेनगर) हा गुरुवारी (ता.१२) शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी परतत असताना अपघातात मृत्युमुखी पडला होता. मात्र या घटनेनंतरही कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसून आल्या नाहीत. केवळ सूचना फलक लावून कर्तव्य पूर्ण केल्याचा आव आणला जात आहे. अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असून शाळकरी विद्यार्थी, नागरिक आणि पादचाऱ्यांसाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था नाही. विशेष म्हणजे, या चौकातून शाळा सुटण्याच्यावेळेत मोठ्या प्रमाणात ही वाहतूक सुरू आहे.
नागरिकांच्या मागण्या
- दर्जेदार व उंच गतिरोधक उभारणे,
- झेब्रा क्रॉसिंग, थर्मोप्लास्टिक पेंट मार्किंग करणे,
- वाहतूक सिग्नल व सीसीटीव्ही बसवणे
- शाळा परिसरात अवजड वाहनांवर वेळेचे निर्बंध घालणे
भोईरनगर चौक ते चिंचवडगाव मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठमोठी अवजड वाहने पार्किंग केली जातात. मुख्य चौकापासून ते चिंचवडगावपर्यंत कुठेही झेब्रा क्रॉसिंग, पेंट मार्किंग नसल्याने वाहने सुसाट चालू असतात. व्यवस्थित गतिरोधक नसल्याने वाहने थांबत नाहीत. नागरिकांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे.
- प्रदीप म्हस्के, स्थानिक रहिवासी
आम्ही अपघातानंतर तत्काळ महापालिकेला पत्रव्यवहार करून झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यासाठी कळविले आहे. जेणेकरून अपघात होणार नाहीत. परंतु अजूनही त्यांच्याकडून पेंट मार्किंगचे पट्टे मारलेले नाहीत. लवकरात लवकर पेंट मार्किंग करावे.
- नीता गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चिंचवड वाहतूक विभाग
रंग मारण्यासाठी एलपीजी गॅसची आवश्यकता असते. मात्र सध्या गॅस तुटवड्याने ठिकठिकाणी रंग मारण्याचे काम राहिले आहे. गतिरोधकासंदर्भात आमचे अधिकारी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील. मानंकनाप्रमाणे गतिरोधक नसेल, तर तो तयार करण्यात येईल.
- वैशाली ननावरे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
CWD26A02925
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

