

देहू, ता.९ : ‘‘प्रयत्न, त्याग आणि सातत्य या गोष्टींच्या जोरावर विद्यार्थी वैज्ञानिक होण्याचे स्वप्न पाहू शकतो. कोणतीही गोष्ट पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ही मेहनत सातत्याने, वारंवार करावी लागते व त्यासाठी काही प्रिय गोष्टींचा त्याग देखील करावा लागतो. प्रत्येक विद्यार्थी हा जन्मजात वैज्ञानिक असतो. पालक म्हणून आपण मुलांच्या प्रश्नांवर, त्यांच्या कृतींवर ओरडा न देता त्यांच्या या प्रयोगशील कृतीला विज्ञानाची जोड दिली पाहिजे,’’ असे प्रतिपादन शास्त्रज्ञ डॉ. सतीश राव यांनी केले.
देहू येथे सृजन फाउंडेशन संचलित अभंग इंग्लिश मीडियम स्कूल व इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या प्रांगणात आयोजित रोबोटिक्स, अंतराळ व तंत्रज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटरमधील डॉ. राव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इस्त्रो स्पेस टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. अरविंद शाळीग्राम, प्रा. भरत कानगुडे, डॉ. सतीश एकार, डॉ. पी. एस. तांबडे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, उपाध्यक्ष अशोक कंद, उपप्राचार्या शैलजा स्वामी आदी उपस्थित होते.
पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण करायला हवी. त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले की विद्यार्थ्यांमधील क्षमतांचा विकास होऊन तो संबंधित विषयांत पारंगत होतो, असे मत डॉ. शाळीग्राम यांनी व्यक्त केले. इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक संतोष पिसे यांनीही विचार मांडले. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी प्रास्ताविक केले.
हालता रोबोट अन् गगनयान...
पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांच्या चांद्रयान २ व ३, मंगलयान, गगनयान, हालता रोबोट, रॉकेट, आर्यभट्ट, विविध अंतराळवीर अशा विविध प्रकल्पांचा या प्रदर्शनात समावेश करण्यात आला. त्यामध्ये माहितीवजा तक्ते, कार्यरत मॉडेल्स यांचा समावेश होता. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी एकच गर्दी केली होती. वैज्ञानिक सतीश राव यांनी पालकांबरोबर खुली चर्चा केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.