ओढ ही पंढरीची मना लागे ।।

ओढ ही पंढरीची मना लागे ।।

Published on

देहू, ता. १७ :
क्षुधा तृष्णा सारी ।
शमली जिवाची ।
ओढ ही पंढरीची ।
मना लागे ।।
संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा बुधवारी (ता.१८) दुपारी अडीच वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी या सोहळ्यासोबत जाणारा लाखो वैष्णवांचा मेळा देहू येथे मंगळवारी सायंकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने दाखल झाला. यावेळी टाळ मृदंग गजरात आणि ‘ज्ञानबातुकाराम’च्या नामघोषात देहूनगरी दुमदुमली आहे.
दरम्यान, मंगळवारी (ता.१७) देऊळवाड्यातील भजनी मंडपाला फुलांची सजावट करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त राज्य-परराज्यांतून विविध गावांतील वारकरी आणि भाविक वाहनांमधून दाखल झालेले आहेत. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलला होता, तर मुख्य देऊळवाड्यात पहाटेपासून वारकऱ्यांची दर्शनासाठी गर्दी होती.

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मानकरी, सेवेकरीही दाखल झाले. पालखी सोहळ्यातील प्रमुख आकर्षण असलेल्या चांदीच्या रथाला पॅालिश करण्यात आली आहे. अब्दागिरी, गरुडटक्के, पूजेचे साहित्य यांना चांदीची झळाळी देण्यात आली आहे. पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व, रथाला जुंपण्यात येणारी बैलजोडी गावात दाखल झाल्याचे पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे यांनी सांगितले.
प्रसाद आणि वारीतील किरकोळ साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये भाविकांची गर्दी होती. संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळ, इस्कॅान यांच्या वतीने भाविकांसाठी अन्नदानाची सोय केली आहे. विविध ठिकाणी पालखी सोहळ्यातील भाविकांना मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि परिसरातील ग्रामस्थांनी तयारी केली आहे. विविध गावांत पालखी सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी भाविकांच्या स्वागतासाठी कमानी उभारलेल्या आहेत. रस्त्यांची दुरुस्ती केली आहे.


अनगडशहा बाबा दर्ग्याजवळ सुशोभीकरण
प्रस्थानानंतर पालखी सोहळा दुसऱ्या दिवशी पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. त्यावेळी पालखी मार्गावरील अनगडशहा बाबा दर्ग्याजवळ पहिली आरती असते. या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले आहे. तसेच चिंचोली येथील शनि मंदिराजवळ पहिला विसावा असतो. या ठिकाणीही पालखीतळाची स्वच्छता करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यातील प्रशासकीय तयारी
- भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाचे दहा टॅंकर उपलब्ध
- नगरपंचायत प्रशासनाकडून चोवीस तास पाणी पुरवठा
- महावितरण कंपनीचे अधिकारी गावात तळ ठोकून आहेत.
- ‘निर्मल वारी’अंतर्गत १,२00 तात्पुरत्या शौचालयांची उभारणी
- वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ७०० पोलिस कर्मचारी तैनात
- आरोग्य विभागातर्फे ठिकठिकाणी बाह्यरुग्ण विभाग सुरू
- गावात ठिकठिकाणी दहा रुग्णवाहिका तैनात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com