तुकोबांचा पालखी सोहळा विसावला
सोहळ्याची क्षणचित्रे
- डुडुळगांव, मोशी, टाळगांव चिखली, तळवडेमार्गे प्रवास
- चारच्या सुमारास पालखीचे गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आगमन
- रामचंद्र तुपे कुटुंबाच्या वतीने बैलजोडी आणि रथाचे औक्षण, दहीभाताचा नैवेद्य
- स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळीच्या पायघड्या, फुलांची सजावट
- मुख्य देऊळवाड्यासमोर आगमन झाल्यानंतर अभंग आरती
- देऊळवाड्यात प्रवेशानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा
देहू, ता. २१ : ‘‘तुकाराम...तुकाराम’’ असा अखंड नामघोष आणि टाळ-मृदंगांच्या निनादात आषाढी वारीहून परतलेल्या संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी (ता.२१) सायंकाळी चारच्या सुमारास देहूत आगमन झाले. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ग्रामस्थ आणि भाविक दर्शनासाठी एकवटले होते. मुख्य देऊळवाड्यात आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला.
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे १८ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले होते. पंढरपुरात आषाढी एकादशीला लाखो भाविकांसमवेत वारी सर्मपित करून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीच्या मार्गाने निघाला. दरम्यान, रविवारी (ता.२०) संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीसाठी हा सोहळा आळंदी शहरात मुक्कामी होता.
सोमवारी (ता.२१) सकाळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहूकडे मार्गस्थ झाला. डुडुळगांव, मोशी, टाळगांव चिखली, तळवडेमार्गे विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरात दुपारी साडेतीन वाजता पालखी सोहळ्याचे आगमन झाले. या ठिकाणी संस्थानच्या वतीने अभंग आरती झाली. त्यानंतर पालखी सोहळा देहूकडे मार्गस्थ झाला. गावाच्या प्रवेशद्वाराजवळील मुख्य कमानीजवळ देहू पंचक्रोशीतील नागरिक पालखीच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास टाळमृदंगांच्या गजरात पालखीचे गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आगमन झाले. परंपरेनुसार रामचंद्र तुपे कुटुंबाच्या वतीने प्रवेशद्वाराजवळ रथाच्या बैलजोडीस आणि रथाला औक्षण करण्यात आले. तसेच दहीभाताचा नैवेद्य दाखवला. यावेळी प्रवेशद्वाराजवळ आबालवृद्धांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मुख्य कमान ते संत तुकाराम महाराज देऊवाड्यादरम्यान पालखीच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. पालखी सोहळा बाजारपेठ मार्गे देऊळवाड्याकडे मार्गस्थ झाला.
सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पालखी संत तुकाराम महाराज जन्मस्थान या ठिकाणी आल्यानंतर आरती झाली. त्यानंतर पालखीचे मुख्य देऊळवाड्यासमोर आगमन झाल्यानंतर अभंग आरती झाली. देऊळवाड्यात प्रवेशानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा झाली. सोहळा भजनी मंडपात विसावला. त्या ठिकाणी संस्थानच्या वतीने आरती झाली.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे यांच्यासह संस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरतीनंतर भजनी मंडपात पालखी सोहळ्यात सहभागी सेवेकरी, विणेकरी, पोलिस कर्मचारी आणि पत्रकारांचा संस्थानच्या वतीने श्रीफळ देत सत्कार करण्यात आला.
देहू : आषाढी वारीचा परतीचा प्रवास संपवून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी देहूत आला. यानंतर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.