प्रस्तावित रेल्वेमार्गाला १२ गावांचा विरोध

प्रस्तावित रेल्वेमार्गाला १२ गावांचा विरोध

Published on

देहू, ता.१९ : तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा नवा रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. यामुळे १२ गावांतील जमिनी बाधित होणार आहेत. त्यावर या १२ गावांतील नागरिकांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. याबाबत नुकतेच देहू येथे ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे सांगर्डी, बोडकेवाडी, झेंडेमळा, काळोखेमळा, तळवडे, निघोजे, कुरुळी ते पुढे लोणीकंदमार्गे उरुळी कांचन ही गावे बाधित होणार आहेत. त्यामुळे शेतकरी, घरे जाणार आहे. त्यातच ‘पीएमआरडीए’ने रिंग रोडचाही प्रस्ताव मांडला आहे. त्यातही जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. या परिसरांतील शेतकऱ्यांच्या भावना शासनाकडे पोचवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, ‘‘या प्रकल्पाचा मार्ग बदलावा,’’ अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मध्य रेल्वेचे पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनाही पत्र दिले आहे.

बाधित शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे : शेळके
याबाबत आमदार सुनील शेळके म्हणाले, ‘‘या रेल्वे प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे. कारण, काहीजण सुरवातीला विरोध करतात. नंतर मागच्या दाराने मोबदला घेतात. त्यामुळे आंदोलन फसते. याचा अनुभव मी घेतला आहे. मी नाहक विरोध करतो, असा प्रचार सर्वत्र होतो. त्यामुळे बाधित होणारे आहेत, त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे,’ असे आवाहन आमदार शेळके यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com