देहूत आज ३७८ वा बीज सोहळा

देहूत आज ३७८ वा बीज सोहळा

Published on

देहू, ता. ४ : संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा गुरुवारी (ता. ५) आहे. यानिमित्त राज्यभरातून भाविकांच्या दिंड्या बुधवारी देहूत दाखल झाल्या. ठिकठिकाणी टाळ-मृदंगांचा गजर आणि विठ्ठलाचा नामघोष यात देहूनगरी दंग झाल्याचे दिसून आले. गावात ठिकठिकाणी गाथा पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठ गमन स्थान मंदिरात पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

यंदा ३७८ व्या बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य देऊळवाड्यात आणि वैकुंठस्थान मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीत विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे ती दुथडी भरून वाहत आहे. हजारो भाविकांनी मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी जाण्यापूर्वी इंद्रायणी नदीत स्नान केले. त्यानंतर भाविकांनी दर्शनबारीतून विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात दर्शन घेतले. बीज सोहळ्यासाठी पंढरपूर, आळंदी या भागातून आलेल्या प्रसाद विक्रेत्यांनी ठिकठिकाणी दुकाने थाटली आहेत. देऊळवाडा आणि वैकुंठस्थान मंदिरासभोवती कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली आहे. मुख्य देऊळवाडा, वैकुंठस्थान, गावाचे प्रवेशद्वार परिसरात सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.
मुख्य सोहळा वैकुंठस्थान मंदिरात असल्याने या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. तसेच नव्याने दर्शनबारीचे काम संस्थानने केले आहे. संस्थानने ३२ सीसीटीव्ही बसवले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांना थोपविण्यासाठी खास पोलिस पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून स्थानिक जीवरक्षकांचे पथक तैनात करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने चार ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आलेले आहेत. आरोग्य केंद्रात बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभागात २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. महावितरण कंपनीनेही कर्मचाऱ्यांचे फिरते पथक तयार केले आहे. नगर पंचायत प्रशासनाने गाव आणि मंदिर परिसर स्वच्छतेसाठी ३५ कर्मचारी तैनात केले आहेत.

दृष्टीक्षेपात...
- देहूनगरी विठूनामाच्या गजरात दंग
- वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीत विसर्ग
- चोरट्यांवर देखरेखीसाठी खास पोलिस पथक तैनात
- चार ठिकाणी बाह्य रुग्ण उपचार केंद्र सुरू
- मंदिर परिसर स्वच्छतेसाठी ३५ कर्मचारी
- प्रसाद विक्रेत्यांनी ठिकठिकाणी थाटली दुकाने

कोंडी टाळण्यासाठी दक्षता
चाकण, तळेगाव, देहूफाटा मार्गाने देहूत येणारी वाहतूक इंद्रायणी नदीवरून बंद करण्यात आली आहे. तसेच आळंदीमार्गे येणारी वाहतूक विठ्ठलवाडी येथे थांबविण्यात आली आहे. देहूरोडकडून येणारी वाहतूक माळवाडीपर्यंत आहे. विठ्ठलवाडी, माळवाडी येथे बसथांब्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे देहूत वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.

DUH26B01369

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com