भंडारा डोंगर पायथ्याला २३ जानेवारीपासून हरिनाम सप्ताह
इंदोरी, ता. २३ ः संत तुकाराम महाराज प्रकटदिन व माघ दशमी अनुग्रह दिनानिमित्त श्रीक्षेत्र भंडारा डोंगर देवस्थानतर्फे २३ ते ३१ जानेवारी दरम्यान अखंड हरीनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व संत महात्म्यांचा उत्सव होणार आहे. दरवर्षी डोंगरावर होणारा हा सोहळा यंदा पायथ्याला सुमारे शंभर एकर क्षेत्रावर होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव सोहळा, संत नामदेव महाराज, संत जनाबाई आदी १४ संतांचा ६७५ वा समाधी सोहळा, संत जनार्दनपंत देशपांडे यांचा ४५० वा संजीवन समाधी सोहळा, संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळा, संत सावता महाराज यांचा ७७५ वा जन्मोत्सव सोहळा व संत नारायण महाराज देहूकर यांचा ३७५ वा जन्मोत्सव सोहळा होईल.
दररोज काकडा भजन, गाथा व ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी अकरा ते साडेबारा आणि सायंकाळी सहा ते आठ कीर्तन, दुपारी भोजन व वारकरी नित्यनेमाचे भजन, दुपारी संत चरित्रकथा, रात्री भोजन आणि त्यानंतर जागर होणार आहे. दुपारी साडेतीन ते पाच दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा ज्ञानेश्वर माऊली कदम करणार आहेत. पारायण व्यासपीठ नेतृत्व नाना महाराज तावरे हो करणार आहेत.
२३ ते ३० जानेवारी दरम्यान अनुक्रमे बंडातात्या कराडकर, संजय महाराज पाचपोर, ॲड. जयवंत महाराज बोधले, चैतन्य महाराज देगलूरकर, अच्युत महाराज दस्तापूरकर, ज्ञानेश्वर महाराज कदम, केशव महाराज नामदास व ज्ञानेश्वर महाराज कदम यांची कीर्तने होणार आहेत. ३१ जानेवारीला सकाळी ९ ते ११ ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे काल्याचे काल्याचे कीर्तन होणार आहे. २८ जानेवारी रोजी दुपारी एक ते तीन दरम्यान डॉ. भावार्थ देखणे व सहकारी यांचे बहुरूपी भारुड होईल.
देहू ते भंडारा डोंगर मिरवणूक
ता. २२ जानेवारी रोजी दुपारी तीन ते पाच दरम्यान देहू ते भंडारा डोंगर पायथा मिरवणूक निघणार असून, त्यात प्रत्येकी ३७५ धर्म ध्वजधारी, कलशधारी, तुळशीधारी, कीर्तनकार, टाळकरी, मृदंगवादक, ब्रम्हवीणाधारी, चोपदार, तुकाराम नावाच्या व्यक्ती, ७५० ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्ती, प्रत्येकी ६७५ नामदेव व जनाबाई नावाच्या व्यक्तींचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ६ ते ७ शांतिब्रह्म मारोती महाराज कुऱ्हेकर यांचे कीर्तन होणार आहे.
वैशिष्ट्य काय
- प्रतिदिन पाच हजार गाथा वाचक
- प्रतिदिन एक हजार टाळकरी
- ज्ञानेश्वरीतील एका ओवीला एक याप्रमाणे ९०३२ वाचक
- प्रतिदिन २५ मृदंग वादक
- चोवीस तास ज्ञानदेव तुकाराम भजन

