

इंदोरी, ता. २२ : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या कुंडमळा येथील इंद्रायणी नदीपात्रातील भौगोलिक रचना धोकादायक असतानाच, बंधाऱ्याची दुरवस्था आणि त्यावरून सुरू असलेली वाहतूकही अपघातांना निमंत्रण देत आहे. बंधाऱ्यावरून पाणी वाहत असतानाही पादचारी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक जीव धोक्यात घालून ये-जा करत आहेत. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी आणि त्यावरून होणारी वाहतूक बंद करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
इंद्रायणीचे बाराही महिने भरलेले पात्र, बंधाऱ्यावरून कोसळणारे पाणी, निसर्गरम्य परिसर, नदीपात्रातील कुंडजाई मातेचे मंदिर आणि बंधाऱ्याखाली पसरलेला काळा खडक पर्यटकांना आकर्षित करतो. खडकांमधील खोल घळ्या, विविध आकारांचे रांजणखळगे आणि पाण्याचे भोवरे हेही पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. त्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. मात्र, वाहत्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने येथे अनेकदा अपघात होतात. त्यातच तरुण पर्यटकांची स्टंटबाजी, हुल्लडबाजी आणि सेल्फी काढण्याचा हव्यास यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या ठिकाणी अनेकांना जीवही गमवावा लागला आहे.
स्थानिक ग्रामस्थ, परिसरातील शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नदीवर साकव पूल होता. त्यावरून पायी तसेच दुचाकीने ये-जा करता येत होती. मात्र, १५ जून २०२५ रोजी हा पूल कोसळल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पर्यायी मार्गाअभावी अनेकजण धोकादायक बंधाऱ्यावरून ये-जा करू लागले आहेत.
या बंधाऱ्यावरून वर्षभर पाणी वाहत असते. त्यातच बंधाऱ्याला जागोजागी खड्डे पडले असून, लहान-मोठी भगदाडेही निर्माण झाली आहेत. या भगदाडांमधून मोठ्या प्रमाणात पाणी खाली कोसळत आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरून अपघात झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. अरुंद आणि दुरवस्था झालेल्या बंधाऱ्यावरून चारचाकी वाहनांचीही सर्रास ये-जा सुरू असल्याने दुर्घटनेची भीती व्यक्त होत आहे. तरी वेळीच बंधाऱ्याची दुरुस्ती करून बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक थांबवावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.