विकासाऐवजी आरोप-प्रत्यारोपांनी मतदार संभ्रमात

विकासाऐवजी आरोप-प्रत्यारोपांनी मतदार संभ्रमात

Published on

जाधववाडी, ता. ९ : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये उमेदवारांच्या प्रचारात स्थानिक विकासाचे मुद्दे पूर्णतः बाजूला पडल्याचे चित्र येत आहे. जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशी आणि कुदळवाडी या भागांतील सर्वांगीण विकासाबाबत ठोस चर्चा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठ्याची अनियमितता, ड्रेनेजच्या समस्या, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, आरोग्य सेवांचा अभाव आणि वाढती वाहतूक कोंडी हे ज्वलंत प्रश्न आहेत. पण, त्यावर चर्चा होण्याऐवजी प्रचाराचा केंद्रबिंदू वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांभोवती फिरत असल्याचे चित्र आहे. मोठ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून एकमेकांवर वैयक्तिक टीका करण्यावरच अधिक भर दिला जात आहे.
प्रचार सभा, पदयात्रा तसेच सोशल मीडियावर विरोधकांच्या चारित्र्यावर शंका घेणे, जुने वाद उकरून काढणे आणि आरोपांची मालिका सुरू ठेवणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत. यामुळे निवडणूक प्रचाराचा दर्जा घसरत असून, विकासाचे ठोस मुद्दे दुय्यम ठरत आहेत. प्रभाग क्रमांक दोनचा पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा काय असेल, कोणत्या समस्या प्राधान्याने सोडवण्यात येणार, याबाबत कोणतीही स्पष्टता न मिळाल्याने मतदार संभ्रमात आहेत.
एकीकडे आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण आणि दुसरीकडे विकासाबाबत मौन, यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष दिसून येत आहे. निवडणूक म्हणजे केवळ सत्ता मिळवण्याची लढाई नसून प्रभागाच्या भविष्यासाठी दिशा ठरवण्याची प्रक्रिया आहे, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
वैयक्तिक टीका आणि आरोपांवर आधारित प्रचारामुळे लोकशाही मूल्यांना धक्का बसत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. विकासाच्या मुद्द्यांवर सुस्पष्ट भूमिका मांडण्याऐवजी विरोधकांना बदनाम करण्यावर लक्ष केंद्रित केल्यास त्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो. यामुळे मतदारांमध्ये उदासीनता वाढून ‘सर्वच सारखे आहेत’ अशी भावना निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागरिकांची अपेक्षा
- अंतिम टप्प्यातील प्रचारात तरी उमेदवारांनी आरोप-प्रत्यारोप थांबवावेत
- प्रभागाच्या विकासासाठी ठोस आराखडे, पारदर्शक कारभाराची हमी द्यावी
- प्रत्यक्ष कामाची स्पष्ट आश्वासने देत मतदारांसमोर यावे,
- रस्ते, पाणी आणि ड्रेनेजसारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा अपेक्षित होती
- आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचाराचा दर्जा घसरल्याची भावना

विकासदृष्टीचा अभाव
प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनेक नागरी समस्या असतानाही, मोठ्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडे ठोस विकासदृष्टीचा अभाव असल्याचे मत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. महापालिका निवडणूक ही प्रभागाच्या भवितव्याचा निर्णय करणारी असल्याने, विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांनाच मतदार पसंती देतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

PNE26V83864

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com