खासगी टँकर, विंधन विहिरीचा व्यवसाय ‘अनियंत्रित’
जाधववाडी, ता.२२ ः अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे जाधववाडी परिसरात टँकर आणि विंधन विहिरी (बोरिंग)च्या पाण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे नियंत्रण नसल्याने काही व्यक्तींकडून नवीन बेकायदा खासगी विंधन विहिरी घेतल्या जात आहेत. बेसुमार भूजल उपसा करुन खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी हजारो रुपये उकळून सोसायट्यांना वेठीस धरले जात आहे.
जाधववाडी परिसरात पिंपरी चिंचवड महापालिकेकडून कमी आणि अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे
अनेक सोसायट्या, नागरी वस्त्यांना खासगी टँकर आणि शेतकऱ्यांच्या विहिरी, विंधन विहिरींवर पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत आहे. अनेक सोसायट्या, बांधकाम प्रकल्प तसेच लहान-मोठे व्यावसायिक आस्थापने खासगी टँकरवर अवलंबून असल्यामुळे पाण्याचा हा धंदा तेजीत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात महापालिकेचा पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने टँकर मागवण्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र, त्याचा गैरफायदा घेत काही व्यक्तींनी खासगी विंधन विहिरी काढून बेसुमार भूजल पाणी उपसा सुरू केला आहे. हे पाणी टँकरमधून विकले जात असून एका टँकरसाठी हजारो रुपये आकारले जात आहेत. वाढीव दराने पाणी खरेदी न केल्यास पाणी बंद करण्याची धमकी दिली जात आहे. त्यामुळे, सोसायट्यांना मनमानी दर मोजावे लागत आहेत.
गंभीर टंचाईची भीती
- काही ठिकाणी विनापरवाना विंधन विहिरी
- सततच्या उपशामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली
- भविष्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची भीती
- खासगी टँकरची ये-जा वाढल्याने रस्त्यांवर कोंडी, अपघाताचा धोका
मागण्या काय ?
- अनधिकृत पाणी व्यवसायावर महापालिकेने नियंत्रण आणावे
- अनधिकृत विंधन विहिरी, टँकर व्यवसायावर तत्काळ कारवाई करावी
- नियमित, नियोजित आणि पुरेसा पाणीपुरवठा केला जावा
- भूजल पातळीचे सर्वेक्षण करावे, नियमांचे काटेकोर पालन करावे
मला एका नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपासून एका व्यक्तीकडून सोसायटी पाणी विकत घेत होती. त्यासाठी पाच वर्षांचा करार केला होता. मात्र, आता तो मध्येच दुप्पट दर वाढवून मागत असून सोसायटीला वेठीस धरले आहे. दर वाढवून द्या नाही; तर पाणी बंद करतो. दुसरा कोणताही पाणी टँकर येऊ देणार नाही, असे म्हणतो अशी मनमानी सुरू आहे.
- रमेश पाटील, अध्यक्ष, नीलय सोसायटी
महापालिका प्रशासनाने योग्यरीत्या आणि योग्य प्रमाणात पाणीपुरवठा केला, तर बाहेरून पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही. मात्र प्रशासनच पाणी सोडत नसल्याने आम्हाला नाइलाजाने पाणी विकत घ्यावे लागत आहे.
टँकर आणि विंधन विहिरींचे पाणी पुरवठादार दुप्पट दर मागत असल्याने आमच्या सोसायटीचा खर्च वाढला आहे.
- विनीत दरवेशी, सदस्य, साई दर्शन सोसायटी
मग, पाणीपट्टी कशाला ?
आम्हाला रोज चार ते पाच टँकर पाणी विकत घ्यावे लागते महिन्याला आमचा पाण्यावरच खर्च जवळपास सत्तर हजार रुपये होत आहे. महापालिकेला पाणीपट्टी आणि कर पण द्यायचा आणि बाहेरून विकत पाणी मागवून आमची गरज भागवायची तर मग महापालिकेला आम्ही कर कशासाठी देतो ? असाही सवाल नागरिक करत आहेत.
या भागातील पाणीपुरवठ्याच्या स्थितीची पाहणी केली असून पुढील आठवड्यात त्यावर नक्कीच तोडगा काढला जाईल. सध्या या परिसरातील जलवाहिनीची तपासणी सुरू आहे.
- प्रीतम बाविस्कर, कनिष्ठ अभियंता, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

