जाधववाडीत महिलांचा पाण्यासाठी आक्रोश
जाधववाडी, ता. २५ ः जाधववाडी येथील सिल्वर सिटी सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनियमित आणि अत्यल्प प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने महिलांनी संताप व्यक्त करत महापालिका प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सोसायटीमधील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, आठवड्यातून केवळ एक-दोन वेळाच पाणीपुरवठा होत आहे. तोही कमी दाबाने होत असल्याने वरच्या मजल्यांवर पाणी पोहोचत नाही. परिणामी महिलांना पहाटेपासूनच पाणी साठविण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. तसेच टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यासाठी सर्व सदस्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.
घरकाम, मुलांच्या शाळा, नोकरी या सगळ्यांमध्ये पाण्यासाठी तास न् तास थांबावे लागत आहे. हा आमच्यासाठी रोजचा संघर्ष झाला आहे, अशी भावना एका महिलेने व्यक्त केली. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभाग आणि सोसायटी समितीकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
सोसायटी समितीलाही जाब
सोसायटीमध्ये उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि साठवणुकीचे व्यवस्थापन करण्यात सोसायटीची समिती अपयशी ठरली आहे. वेळेवर टाक्यांची स्वच्छता, मोटारची देखभाल आणि टँकरचे नियोजन योग्य पद्धतीने केले जात नाही, असा आरोप करत गुरुवारी सकाळी काही महिलांनी सोसायटी समितीच्या सदस्यांना घेराव घातला. लवकरात लवकर नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा तसेच योग्य पाणी नियोजन न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
पाण्याच्या नियोजनाबाबत आम्ही सदस्यांची बैठक घेणार आहोत आणि त्याठिकाणी आम्ही आमची बाजू आणि प्रश्न मांडून सदस्यांच्या शंकेचे निरसन करणार आहोत. त्याबाबत आणखी सविस्तर माहिती देऊ शकत नाही.
- समीर गुप्ते, खजिनदार, सिल्वर सिटी सोसायटी
सिल्वर सिटी सोसायटी परिसरातील जलवाहिनीची पाहणी करून कुठे पाणी गळती होत आहे का ? हे तपासून योग्य नियोजन ते केले जाईल. पाणी टँकरबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल.
- प्रीतम बाविस्कर, कनिष्ठ अभियंता, ‘क’ क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

