अनधिकृत नळजोडधारकांना ५० टक्के दंड

अनधिकृत नळजोडधारकांना ५० टक्के दंड

देहूरोड,ता.१६ : अनधिकृत नळजोडधारकांकडून ५० टक्के दंड आकारण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंटच्या बुधवारी (ता.१५) झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसेच शगुन सोसायटी, थॉमस कॉलनी येथील सांडपाणी भातशेतीत जाऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला करण्यात आल्या.
यशवंतराव चव्हाण सभागृहात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर अमन कटोच यांच्या अध्यक्षतेखाली वरील सभा झाली. या सभेस कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत, नामनिर्देशित सदस्य ॲड. कैलास पानसरे हे उपस्थित होते.
पुष्पांजली रावत म्हणाल्या, ‘‘इंदिरानगरमधील नागरिकांकडून अधिक नळजोडाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, हा परिसर वन खात्याच्या जागेवर वसलेला असल्याने यापूर्वीचेच नळजोड बेकायदेशीरपणे घेतले गेल्याची माहिती आहे.’’
त्यावर सभेत चर्चा होऊन संबंधित नळ जोडधारकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय सभेत घेण्यात आला. दंड नेमका किती आकारायचा यावर बराच ऊहापोह झाल्यावर ५० टक्के दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत तक्रारी आल्याचे सांगा, त्यांना नोटिसा काढा, दंड भरण्यासाठी त्यांना अवधी द्या, अशा सूचना ब्रिगेडियर कटोच यांनी प्रशासनास दिल्या.

सोसायटीतील सांडपाणी भातशेतात
शगुन सोसायटी, थॉमस कॉलनी येथील सांडपाण्याबाबतचा विषयपत्रिकेवरील मुद्दा रावत यांनी मांडला.
याभागात एसटीपी प्लॅन्ट नसल्याने सांडपाणी शेतकऱ्यांच्या भात शेतीत जात आहे. त्यामुळे भाताचे जे उत्पन्न येते त्याच्या दर्जावर आरोग्याच्या दृष्टीने परिणाम होत असल्याची तक्रार प्रशासनास प्राप्त झाल्याकडे रावत यांनी सभेचे लक्ष वेधले.यावर ब्रिगेडियर कटोच यांनी खबरदारी घेण्याची सूचना आरोग्य विभागास केली. पावसाळी पाण्याचे नैसर्गिक मार्ग बुजता कामा नये, याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले.

कचऱ्यावरील पुनर्नप्रक्रिया
कचऱ्यातून पुनर्नप्रक्रिया (रिसायकल) ची माहिती देत पुष्पांजली रावत यांनी यासाठी स्थानिक पातळीवर नागरिकांचे सहकार्य घेणार असल्याचे सांगितले. यावर अहमदनगर कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये झालेल्या कचऱ्यातून पुनर्नप्रक्रियेची माहिती घेण्याची सूचना ब्रिगेडियर कटोच यांनी केली.

अतिक्रमण कारवाई
कॅन्टोन्मेंटच्या निगडी येथील भाडेतत्वावर दिलेल्या गाळ्यांची अतिरिक्त हद्द वाढविली त्या गाळेधारकांवर कारवाईची सूचना कॅन्टोन्मेंट अध्यक्षांनी केली. संबंधिताचे वीजजोड तोडले असून करार संपुष्टात आल्याची पत्रे दिल्याची माहिती रावत यांनी दिली. दरम्यान, त्यांना व्यवसायाची अजून एक संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे गेट हॉटेलला नोटिस बजावा
लष्कराच्या निगडी येथील पुणे गेट हॉटेल समोरील लष्कराच्या ए २ लॅन्डमध्ये संबंधित हॉटेलच्या वाहनांचे अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला गेला. ही बाब गांभीर्याने घेत ब्रिगेडियर कटोच यांनी तेथे सरकारी एजन्सीद्वारे खोदाई करून वाहने उभी करण्यास मनाई करण्याचा इशारा दिला. याबाबत पुणे गेटला नोटिस बजावण्याची सूचना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत यांना केली. याबाबत २९ एफएडी आणि स्थानिक लष्करी मुख्यालय यांना कळविणार असल्याचे रावत यांनी सांगितले.

सभेस आमदार, खासदारांची पुन्हा दांडी
सर्वसाधारण सभेसाठी स्थानिक आमदार सुनील शेळके आणि खासदार श्रीरंग बारणे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. परंतु मागील सर्वसाधारण सभांप्रमाणेच याही सभेस आमदार आणि खासदार उपस्थित नसल्याचे दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com