कचरा संकलन केंद्राचे काम बंद पाडले
किवळे, ता. १५ : किवळे परिसरातील नियोजित कचरा संकलन केंद्राच्या कामास विरोध दर्शविला असताना पिंपरी चिंचवड महापालिकेने अचानक त्याला सुरुवात झाल्याने संतप्त स्थानिक रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी नागरिकांना मागे हटविण्याचा प्रयत्न केल्याने काही प्रमाणात तणाव निर्माण झाला.
किवळे येथील लोकवस्तीच्या भागात महापालिकेने कचरा संकलन केंद्र प्रस्तावित केले आहे. त्याला के - व्हिले सोसायटीतील रहिवाशांसह अन्य नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. मात्र, महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पोलिस बंदोबस्तात आधुनिक यंत्रसामग्रीसह काम सुरू करण्यात आले. त्याची माहिती मिळताच नागरिकांनी आक्रमक होत घटनास्थळी धाव घेऊन काम तत्काळ थांबविले. कामाच्या ठिकाणी कोणताही अधिकृत माहिती फलक नसल्याने नागरिक अधिकच संतप्त झाले. कचरा संकलन केंद्राबाबत माहिती, पारदर्शकतेचा अभाव आणि प्रशासनाचा एकतर्फी निर्णय यामुळे रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आंदोलनाचा इशारा
कचरा संकलन केंद्राच्या कामाबाबत स्पष्ट माहिती देणारा फलक न लावल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून कचरा संकलन केंद्र अन्य ठिकाणी हलविण्याच्या मागणीसाठी आम्ही लवकरच तीव्र आंदोलन करु, असा इशारा के - व्हिले सोसायटीतील नागरिकांनी दिला आहे. यावेळी के व्हिले सोसायटीचे रहिवासी सुनील प्रधान, सारिका धुरगुडे, राजेंद्र तरस तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
का आहे हरकत ?
प्रस्तावित कचरा संकलन केंद्राच्या विरोधात के-व्हिले सोसायटीतील रहिवाशांनी महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालकांकडे लेखी हरकत नोंदवली आहे. त्याने परिसरात दुर्गंधी पसरून आजार फैलावण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या हरकती गांभीर्याने घ्याव्यात आणि रहिवाशांच्या हितासाठी केंद्राचे स्थान अन्यत्र हलवावे, अशी मागणी रहिवाशांनी विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
आम्ही लाखो रुपये खर्च करून सदनिका घेतली आहे. कचरा डेपोबाबत आधी कल्पना असती; तर ती घेतली नसती. या कचरा संकलन केंद्रामुळे सदनिकांची किंमत कमी होऊ शकते आणि प्रदूषण होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी हे केंद्र नको.
- सारिका धुरगुडे, सभासद, के-विले सोसायटी, किवळे
कचरा संकलन केंद्राचे आरक्षण आहे. अगोदरही इथे कचरा संकलन सुरूच आहे. फक्त आता ते बंदिस्त करत आहोत. शासनाकडून २०२२-२३ मध्ये १५ व्या वित्त आयोगांतर्गत निधी प्राप्त झाला असून त्यातून हे काम सुरू करण्यात आले आहे.
- एच. पी. बन्सल, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.