किवळेवासीयांची स्वाक्षरी मोहीम सुरू
किवळे, ता.१७ : किवळे परिसरात उभारण्यात येत असलेल्या कचरा संकलन केंद्राविरोधात स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यांनी Change.org वर ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम (पिटीशन) सुरू केली असून तिला आतापर्यंत दोन हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला आहे.
सोसायट्या, शाळा आणि ऑर्डनन्स फॅक्टरीपासून हे केंद्र केवळ २०० मीटर अंतरावर उभारण्यात येत आहे. पर्यावरणीय नियमांनुसार अशा प्रकल्पांपासून किमान ५०० मीटरचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, प्रशासनाने हे नियम पायदळी तुडवत काम सुरू केले आहे, असा आरोप रहिवाशांनी केला.
दुर्गंधी, वायू आणि ध्वनी प्रदूषण, उंदरांचा उपद्रव, नागरिक विशेषतः लहान मुले, वृद्धांना संसर्गजन्य आजारांचा धोका उत्पन्न होईल, अशी भीती रहिवासी व्यक्त करत आहेत. ऑर्डनन्स फॅक्टरीच्या शेजारी केंद्र असल्यामुळे तेथे आग लागल्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. ऑर्डनन्स फॅक्टरीनेही पत्राद्वारे या धोक्यांकडे लक्ष वेधले आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये केंद्राच्या कामाला स्थगिती मिळाली होती. मात्र, तरीही पीसीएमसीने अत्यंत वेगाने काम सुरू केले. नागरिकांनी संबंधित कागदपत्रे सादर करून आपला विरोध अधोरेखित केला आहे.
काय आहे मागणी ?
- कचरा संकलन केंद्र हे रहिवासी भागातून दूर हलविण्यात यावे
- राज्य आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जावे
तुमचा पाठिंबा महत्वाचा
केंद्राचे काम थांबवण्यासाठी रहिवाशांनी एकजूट केली असून ऑनलाईन मोहिमेवर (पिटीशन) स्वाक्षरी करण्याचे आवाहन केले आहे. फक्त २ मिनिटांचा वेळ देऊन तुम्ही ही लढाई मजबूत करू शकता, असे आवाहन जवळपास राहणाऱ्या रहिवाशांना करण्यात आले आहे.
आमच्या सोसायटीच्या बिल्डरने सदनिका विक्रीदरम्यान कधीही ‘एसडब्ल्यूटी’चे आरक्षण उघड केले नाही. सरकारी आरक्षण असूनही महापालिकेने कधीही तसा फलक लावला नाही. त्यामुळे आमची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आहे. मी नियमितपणे कर भरत असूनही महापालिका अधिकारी लोकनियुक्त प्रतिनिधींचे ऐकण्यास इच्छुक नाहीत. त्यांना जे हवे ते आणि जिथे हवे ते करण्याच्या मनःस्थितीत आहेत.
- अक्षय पाटील, किवळे
KIW25B04759
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.