मामुर्डी-सांगवडे पूल पाडण्यास सुरुवात
किवळे, ता. १९ : पवना नदीवरील मामुर्डी- सांगवडे येथील लोखंडी पूल पाडण्यास बुधवारी (ता. १९) सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात मामुर्डी बाजूचा संपूर्ण पूल हटविण्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने दिली.
महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे उपअभियंता नीलेश दाते यांच्या उपस्थितीत दोन क्रेन, पोकलेन, ट्रॅक्टर, दोन ब्रेकर यांच्या साह्याने हे काम सुरू आहे. तसेच अग्निशमन दल, महाराष्ट्र सुरक्षा दल, देहूरोड आणि शिरगाव पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.
कुंडमळा येथील पूल कोसळल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीस बंद केला होता. त्यानंतर पालिकेने केलेल्या स्ट्रक्चर ऑडिटमध्येही पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि नवीन पुलाच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा पूल पाडण्यात येत असल्याचे उपअभियंता नीलेश दाते व कनिष्ठ अभियंता अमोल पाचंगे यांनी सांगितले.
दरम्यान, या पुलावरील वाहतूक फेब्रुवारी २०२५ ते ऑक्टोबर २०२७ या कालावधीत नवीन पूल पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे सांगवडे परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
पर्यायी मार्ग...
सांगवडे वासियांना आता जांबे-कोयते वस्ती-पुनवळे मार्गे पुणे व पिंपरी चिंचवडला जाता येणार आहे. तसेच दारुंब्रे-गोडुंब्रे-शिरगाव- गहुंजे मार्गेही पिंपरी चिंचवडमध्ये पर्यायी प्रवास करता येईल.
...म्हणून पाडला पूल
आगामी काळात सांगवडेचा पालिकेत समावेश होणार असल्याने सांगवडे-मामुर्डीस जोडणाऱ्या नव्या पुलाचे काम पालिकेने हाती घेतले आहे. या कामात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून पवना नदीवरील हा जुना लोखंडी पूल पाडण्यात येत आहे.
सांगवडेवासियांना तात्पुरता दिलासा म्हणून जांबे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. तसेच पालिकेच्या गहुंजे-साळुंब्रे पुलाचे काम लवकर मार्गी लावल्यास सांगवडे-मामुर्डी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत परिसरातील दळणवळण मोठ्या प्रमाणात सुलभ होऊ शकते. या दोन्ही पर्यायांचा समावेश करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमदार आणि पालिका प्रशासन यांनी गंभीरपणे विचार करावा.
-बाबासाहेब औटी, ग्रामस्थ, सांगवडे
कुंडमळा येथील पूल पडून मोठी दुर्घटना घडली होती. सांगवडे पूलही जुना झाल्याने प्रशासनाने वेळीच तो पाडण्याचा निर्णय घेतला, हे योग्य झाले. नवीन पुलाचे काम लवकर व्हावे.
-सुनिता राक्षे, गृहिणी, सांगवडे
हा पूल पाडल्याने जवळचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. पूल जुना असल्याने तो पाडला, हे योग्य झाले. परंतु नवीन पुलाचे काम लवकर व्हावे, जेणेकरून वाहतूक पुन्हा पूर्ववत होईल. सध्या जांबे मार्गे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे हा रस्ता लहान मुलांच्या दृष्टीनेही धोकादायक ठरतो.
-बायडाबाई राक्षे, सांगवडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

