रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रावेतमध्ये अपघाताचा धोका

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रावेतमध्ये अपघाताचा धोका

Published on

किवळे, ता.३० : रावेत येथील सर्व्हे क्र. ११३ मधील एस. बी. पाटील शाळेजवळील निवासी परिसरातील रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याशिवाय अपघाताचा धोकाही वाढला आहे.
गेल्या चार वर्षांत या भागात रहिवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अद्याप येथे पक्का डांबरी रस्ता करण्यात आलेला नाही. स्थानिक रहिवाशांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे बांधकाम परवानगी तसेच मिळकत कराच्या स्वरूपात लाखो रुपयांचा भरणा केला आहे, असे असतानाही मूलभूत सुविधा उपलब्ध न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर चिखल व पाणी साचत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. लहान मुले, महिलांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांसाठी या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.
या परिसरात शाळा आणि अनेक निवासी इमारती असल्याने वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढला असून आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे.
याबाबत रावेत परिसरातील नागरिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ब’ प्रभाग स्थापत्य विभागाने त्वरित दखल घेऊन या रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण करावे, अशी मागणी केली आहे.
स्थानिक रहिवासी अस्मिता सोनवणे म्हणाल्या, ‘‘नियमित कर भरूनही आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाहीत. पावसाळ्यात रस्त्याने ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. महापालिकेने तातडीने डांबरीकरण करावे.’’
PNE25V80975

Marathi News Esakal
www.esakal.com