लष्करी वाहनांनाही वाहतूक कोंडीचा फटका

लष्करी वाहनांनाही वाहतूक कोंडीचा फटका

Published on

देहूरोड, ता.२६ : देहूरोड बाजारपेठ परिसरात बेकायदेशीररीत्या रस्त्यावर वाहने उभी केल्यामुळे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांसह लष्करी वाहनांनाही त्याचा फटका बसत आहे. देहूरोड रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या अबूशेठ रस्त्यावर ही परिस्थिती पाहायला मिळत आहे.
जगताप पेपर एजन्सीसमोर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहने उभी केली जात असल्याने रस्ता अरुंद होत आहे. याचवेळी लष्कराची दोन वाहने वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे चित्र दिसून आले. त्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
या रस्त्यावर बाजारपेठ असल्याने दिवसभर खरेदीसाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्त्यावरच दुचाकी व चारचाकी वाहने उभी केल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरत नाही. ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वाहतूक पोलिसांचे या प्रकाराकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने वाहनचालकांचे मनोबल वाढले असल्याचे नागरिकांनी सांगितले.

कडक अंमलबजावणी हवी
देहूरोड रेल्वे स्थानकाकडे जाणारा हा महत्वाचा मार्ग असल्याने येथे नो-पार्किंगची कडक अंमलबजावणी व वाहतूक नियंत्रणाची तातडीची गरज असल्याचे किवळे, विकासनगर भागातील रेल्वे प्रवासी, कामगार व विद्यार्थ्यांनी केली आहे.

नागरिकांचे म्हणणे...
बाजारपेठेत दररोज अशीच परिस्थिती असते. रस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते आणि पादचाऱ्यांना अपघाताचा धोका पत्करुन चालावे लागते. या प्रकरणी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी.
- अजय लांगे, नागरिक

देहूरोड रेल्वे स्थानकाकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. तरीही येथे कोणतेही वाहतूक नियोजन दिसत नाही. लष्करी वाहने सुद्धा अडकत असतील, तर सामान्य नागरिकांची अवस्था काय असेल ? याचा विचार करायला हवा.
- सागर लांगे, नागरिक

अतिक्रमणे व बेकायदेशीर पार्किंगवर नियमित मोहीम राबविली तरच समस्या सुटेल. अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
- अतुल राऊत, नागरिक

पोलिसांचे म्हणणे
बाजारपेठ परिसरातील वाहतूक कोंडीची दखल घेतली असून बेकायदेशीर पार्किंगवर विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनीही नियमांचे पालन करून रस्त्यावर वाहने उभी करू नयेत अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- विक्रम बनसोडे, पोलिस निरीक्षक, देहूरोड पोलिस ठाणे

KIW26B05467

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com