किवळेतील विकासनगर मुख्य रस्त्याचे रुंदीकरण प्रलंबित
किवळे, ता. १ : किवळे गावाचा पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत समावेश होऊन तब्बल २९ वर्षे उलटली असली तरी विकासनगर येथील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण अद्याप झालेले नाही. मात्र, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्या असून गृहप्रकल्प, व्यावसायिक दुकानांची भर पडली आहे. त्याने वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. परिणामी, या अरुंद रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी होत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड सीमेनंतर महापालिका हद्द सुरू होते. एम.बी. कॅम्प परिसरातील नेटके कॉर्नर चौकापासून शिंदे पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने मोठी वाहने जाताना अडचणी निर्माण होतात. विशेषतः महापालिकेच्या बस एकमेकांना क्रॉस करताना अनेकदा वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. वाढत्या वाहनसंख्येमुळे अपघाताचा धोका देखील वाढला असून रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
‘‘किवळे परिसराचा वेगाने विकास झाला. मात्र, रस्ते पूर्वीच्याच अवस्थेत आहेत. रोजच्या वाहतुकीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने तातडीने निर्णय घ्यावा.’’
- नीता चव्हाण, रहिवासी
किवळे परिसरात पूर्वी मंजूर झालेली काही कामे प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्याच्या अर्थसंकल्पात निधी मर्यादित आहे; मात्र पुढील अर्थसंकल्पात या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव निश्चितपणे हाती घेतला जाईल.
- अजय सूर्यवंशी, स्थापत्य अधिकारी ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
उड्डाणपुलामुळे संपर्क सुलभ होणार
कात्रज - देहूरोड बाह्यवळण महामार्गालगत विकासनगर आणि उत्तमनगरला जोडणाऱ्या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुमारे १८ कोटी रुपये खर्चाचा पूल उभारण्याचे काम सुरू आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर महापालिका हद्दीतील उत्तमनगर व विकासनगर यांच्यात थेट संपर्क प्रस्थापित होणार असून गेल्या काही वर्षांत घडलेल्या अपघातांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या उत्तमनगर परिसरातील नागरिकांना विकासनगरमध्ये जाण्यासाठी मुकाई चौक मार्गे मोठा वळसा घालावा लागतो. अनेकजण शिंदे पेट्रोल पंपाजवळील धोकादायक महामार्ग ओलांडून प्रवास करतात. याच ठिकाणी यापूर्वी जवळपास एक डझन नागरिकांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली. दरम्यान, महामार्ग प्रकल्पाच्या स्थानिक व्यवस्थापकांशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.
उड्डाणपूल पूर्ण झाल्यास नागरिकांची मोठी सोय होईल आणि जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याची वेळ येणार नाही. यासंदर्भात देहूरोड पोलिसांनीही या धोकादायक मार्गाकडे लक्ष द्यावे.
- बाळासाहेब झंझाड, उत्तमनगर
सध्या सर्वत्र रहदारी वाढली आहे. मात्र, त्यामध्ये बेशिस्तपणा अधिक दिसून येतो. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे.
- विक्रम बनसोडे, पोलिस निरीक्षक
KIW26B05473
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

