

किवळे, ता.२८ : किवळे परिसरात कातळे वस्ती ते स्मशानभूमी तसेच जी.के. सोसायटी ते सांडभोर वस्ती दरम्यान रस्ता अतिशय खराब झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच क्रशसॅण्ड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे सर्वत्र धूळ उडून रस्त्याची अधिकच दुरवस्था झाली आहे. सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरात खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत.
गेल्या पाच ते दहा वर्षांत किवळेतील कातळे वस्ती परिसरात गृहनिर्माण प्रकल्प मोठ्या प्रमाणात वाढले. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्ग, हिंजवडी आयटी पार्क आणि द्रुतगती महामार्गाजवळील स्थान तसेच पवना नदी परिसराचे नैसर्गिक वातावरण पाहून नागरिकांनी गुंतवणूक करून सदनिका खरेदी केल्या. परिसर विकसित होईल, मूलभूत सुविधा मिळतील, अशी त्यांना सुरुवातीला अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, सततची धूळ आणि अवजड वाहनांची वर्दळ यामुळे तेथील रहिवाशांचे जगणेच कठीण झाले आहे. जवळच असलेल्या क्रशर आणि आरएमसी प्लांटमुळे दिवसभर जडवाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे रस्ते आणखी खराब होत असून आरोग्यावरही परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही सदनिका घेऊन चूक तर केली नाही ना ? अशी भावना आता त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे.
श्वसनासंबंधित त्रास
या रस्त्यावरून विद्यार्थी, स्थानिक रहिवासी तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यातच बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनांची अलीकडेच वर्दळ वाढल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. रस्त्यावर मुरूम टाकणे किंवा डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वत्र धूळ उडत असून नागरिकांना डोळे आणि श्वसनासंबंधी त्रास होत आहेत. गतिरोधकांचा अभाव असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. त्यामुळे तातडीने रस्त्यांचे डांबरीकरण करणे, धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना आणि आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
किवळेतील कातळे वस्ती ते सांडभोर वस्तीपर्यंतच्या रस्त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यास सूचना केली आहे. त्यांच्याकडून पाहणी करण्यात येईल व पुढील प्रक्रिया करण्यात येईल.
- अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
किवळे गावातील कातळे वस्ती, सांडभोर वस्ती, जी.के. शालिग्राम सोसायटी ते स्मशानभूमी दरम्यानचा रस्ता गॅस एजन्सीकडून खोदून ठेवण्यात आला आहे. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारचे मुरूम टाकण्यात आलेले नाहीत किंवा डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
- विकास कातळे, स्थानिक नागरिक किवळे
मोठ्या वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावर खड्डे वाढत आहेत. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी.
- अशोक तरस, सामाजिक कार्यकर्ते, किवळे
रस्त्यावरील धुळीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- रेश्मा येवले, हॉटेल व्यावसायिक, किवळे